शिर्डीतून विखेंना रोखण्यासाठी 'या' तरुण नेत्याला संधी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 04:39 PM2019-07-29T16:39:22+5:302019-07-29T16:48:07+5:30

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे या तरूण नेत्याला शिर्डीतून रिंगणात उतरवण्याचे ठरवले असल्याची चर्चा आहे.

radhakrushna Vikhe patil Against congress Young Candidate Will fight | शिर्डीतून विखेंना रोखण्यासाठी 'या' तरुण नेत्याला संधी ?

शिर्डीतून विखेंना रोखण्यासाठी 'या' तरुण नेत्याला संधी ?

Next

मुंबई - लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत नेहमी दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघाची चर्चा पाहायला मिळत असते. अशीच काही चर्चा सध्या गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघाची सुरु आहे. शिर्डीमधून विखेंच्या विरोधात सक्षम असा उमेदवार नसल्याची चर्चा असतानाचा, काँग्रेसने महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे या तरूण नेत्याला शिर्डीतून रिंगणात उतरवण्याचे ठरवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

२०१४ मध्ये शिर्डी मतदारसंघात सलग पाचव्यांदा राधाकृष्ण विखे पाटील निवडून आले होते. त्यामुळे शिर्डी मतदारसंघ म्हणजे विखेंचा गड समजला जातो. यात चार वेळा विखे काँग्रेसकडून निवडून आले आहेत. तर विखे आता भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवारी नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता विखेंच्या विरोधात सत्यजित तांबे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे तांबे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे मामा-भाचे मिळवून विखेंच्या गडाला धक्का देणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

सरकार विरोधात अभिनव आंदोलने करणारा तरूण नेता आणि आक्रमक नेतृत्व अशी तांबे यांची ओळख आहे. तर त्यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०१४ ला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यामुळे विखेंच्या विरोधात थेट त्यांना रिंगणात उतरवण्यासाठी काँग्रेस विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिर्डी मतदारसंघात गणेश सहकारी साखर कारखाना, प्रवरा सहकारी साखर कारखाना, शिर्डी नगरपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,मार्केट कमिटी यावर विखेंचा वरचष्मा आहे. तर गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्याचा विक्रमही विखेंनी केला होता . त्यामुळे विखेंना शिर्डीत पराभूत करणे तांबेंपुढे मोठे आव्हान आहे. तर भाच्याचा मदतीला थोरात कितपत धावून येणार आणि त्याचा फायदा तांबे यांना होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title: radhakrushna Vikhe patil Against congress Young Candidate Will fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.