प्रक्षेपातील तांत्रिक त्रुटीमुळे  चांद्रयान 2 मोहीम स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:23 PM2019-07-15T16:23:12+5:302019-07-15T16:31:20+5:30

प्रक्षेपणाला 56 मिनिटे 24 सेकंद उरले असताना तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्रोच्या वतीने करण्यात आली..

Postponement of Chandrayaan 2 campaign due to technical problem of the project | प्रक्षेपातील तांत्रिक त्रुटीमुळे  चांद्रयान 2 मोहीम स्थगित

प्रक्षेपातील तांत्रिक त्रुटीमुळे  चांद्रयान 2 मोहीम स्थगित

Next
ठळक मुद्दे10 दिवसांत शोधणार बिघाड : जीएसएलव्हीच्या इंधनाच्या टाकीत दोष चांद्रयान 2 मोहीम यापूर्वीही दोन वेळा स्थगित

- निनाद देशमुख
श्रीहरिकोटा : जगाचे लक्ष लागलेल्या बहुप्रतिक्षित चांद्रयान 2 मोहीम प्रक्षेपक जीएसएलव्ही मार्क 3 च्या इंधनाच्या टाकीत तांत्रिक दोष आढळल्याने स्थगित करण्यात आली. सोमवारी पहाटे प्रक्षेपणापूर्वी प्रक्षेपकाची तपासणी करताना ही त्रुटी आढळल्याने मोहीम प्रमुखांनी मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. येत्या 10 दिवसांत बिघाडाच्या कारणांची तपासणी करून त्यानंतर प्रक्षेपणाची पुढील तारीख इस्रोतर्फे जाहीर करण्यात येणार असल्याचे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले.  
'' चांद्रयान 2 '' चे प्रक्षेपण सोमवारी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी करण्यात येणार होते. त्यासाठी काऊंटडाऊनही सुरू झाले होते. पण प्रत्यक्ष प्रक्षेपणाला 56 मिनिटे 24 सेकंद उरले असताना तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्रोच्या वतीने करण्यात आली.
 या प्रक्षेपणासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याचबरोबर जवळपास 5 हजार जणांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.  जगभरातून या प्रक्षेपणाचे वार्तांकन करण्यासाठी अनेक नामांकित वृत्त समूहांचे प्रतिनिधीही या ठिकाणी उपस्थित होते. रविवारी सकाळी प्रक्षेपकात इंधन भरल्यावर इस्रोचे शास्त्रज्ञ प्रत्येक गोष्टींकडे लक्ष ठेऊन होते. प्रक्षेपणात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी ते प्रयत्नशील होते. 
रात्री 10 वाजता चेन्नई येथून हा सोहळा जगभरात दाखवण्यासाठी विशेष गाडीतून पत्रकारांना श्रीहरीकोटा येथे नेण्यात आले. दरम्यान, सकाळपासून प्रक्षेपणाची उलटी गणती सुरू करण्यात आली होती.
मुख्य कंट्रोलरूममधून शास्त्रज्ञ प्रत्येक क्षणाची माहिती देत होते. शास्त्रज्ञांची तयारी पाहण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी राष्ट्रपती नियंत्रण कक्षात उपस्थित होते. २ वाजता प्रक्षेपणाला 56.24 सेकंद उरले होते. यावेळी मोहीम प्रमुखांना प्रक्षेपकाच्या इंधनाच्या टाकीत त्रुटी आढळली. यामुळे प्रक्षेपण काही काळापुरते होल्डवर ठेवण्यात आल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. परंतु मोहीम सुरू होण्यापूर्वीच इस्रोच्या शास्त्रज्ञांना ही तांत्रिक त्रुटी मोठी असल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी ही मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
-----
इस्रोचे अधिकारी माध्यमांशी बोलताना म्हणाले, की प्रक्षेपणाच्या दरम्यान शास्त्रज्ञांना प्रक्षेपकात काही त्रुटी आढळल्या. यामुळे प्रेक्षपण स्थगित करण्यात आले असून, काही दिवसांत नवी तारीख जाहीर करण्यात येईल.
-----
 

छोटीशी चूकही ठरू शकते धोकादायक!

अंतराळात यान सोडण्याच्या कुठल्याही मोहिमेत मोठ्या प्रमाणात दक्षता घेतली जाते. कारण छोट्याशा त्रुटींमुळे अपघाताची शक्यता असते.  चांद्रयान 2 मोहीम भारताची महत्वाकांक्षी मोहीम आहे. या मोहिमेच्या यशासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ गेल्या 11 वर्षांपासून  झटत आहेत. या मोहिमेसाठी जवळपास एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहे. यामुळे थोडीही त्रुटी ही संपूर्ण मोहीम उदध्वस्त करू शकते. असे झाल्यास येणाऱ्या मोहिमांवर तसेच मनोबलावर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळेच तूर्तास यानाचे प्रक्षेपण स्थगित करण्यात आले आहे. चांद्रयान 2 मोहीम यापूर्वीही दोन वेळा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत तांत्रिक बिघाड शोधून नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Postponement of Chandrayaan 2 campaign due to technical problem of the project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.