सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शुल्कवाढीच्या निर्णयाला एका वर्षासाठी स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 06:08 PM2020-05-23T18:08:00+5:302020-05-23T18:08:56+5:30

पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

One year stay of decision to increase fees by the university | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शुल्कवाढीच्या निर्णयाला एका वर्षासाठी स्थगिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शुल्कवाढीच्या निर्णयाला एका वर्षासाठी स्थगिती

Next
ठळक मुद्देव्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्क वाढीला एका वर्षासाठी स्थगिती

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या शुल्कवाढीच्या निर्णयाला विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत शनिवारी एका वर्षासाठी स्थगिती देण्यात आली. या निर्णयाने कोरोनामुळे ओढवलेल्या परिस्थितीत पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी विद्या परिषदेची बैठक पार पडली. त्यात विद्यापीठ प्रशासनातर्फे सादर करण्यात आलेल्या शुल्कवाढी संदर्भातील प्रस्तावाला एक मताने मंजुरी मिळाली. विद्यापीठाच्या शुल्क नियमन समितीने गेल्या काही महिन्यांपूर्वी सर्व अनुदानित व विनाअनुदानित अभ्यासक्रमांच्या शुल्कात सुमारे 20 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने शुल्क वाढीचे परिपत्रक प्रसिद्ध केले होते. कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क आकारणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शुल्क वाढीच्या निर्णयाला एका वर्षासाठी स्थगिती देण्यात आली.तसेच यापूर्वी आकारले जात असलेले  जुने शुल्क आकारण्यास मान्यता देण्यात आली.
कुलगुरू डॉ.नितीन करमळकर म्हणाले, विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयाअंतर्गत शिकवल्या जाणाऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्क वाढीला एका वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच कोरोनामुळे घ्याव्या लागणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भातील प्रारुप आराखड्यास मान्यता घेण्यात आली. मात्र,परीक्षेचे स्वरूप नंतर ठरविले जाणार आहे. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही,याची खबरदारी विद्यापीठ प्रशासनातर्फे घेतली जाणार आहे. परदेशी विद्यार्थी,परराज्यातील विद्यार्थी किंवा काही कारणास्तव परीक्षा न देऊ शकलेले विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी लागणार आहे,असे या बैथकितून समोर आले.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता आपले अभ्यासक्रम किती तकलादू आहेत. तसेच कोरोना सारख्या साथीचा सामना करण्यासाठी आपली आवश्यक तयारी असणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा व विविध अभ्यासक्रम तयार करणे आवश्यक आहे, अशी चर्चाही या बैठकीत करण्यात आली.
--------
विद्यापीठातर्फे सुमारे पन्नास सुधारित अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली.त्यात फाईन आर्ट सारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच दहा ते बारा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. संशोधन करणाऱ्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांची मौखिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

Web Title: One year stay of decision to increase fees by the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.