Now Ayurveda, Unani, Homeopathy treatment even on mild, moderate corona patients | आता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार

आता सौम्य, मध्यम कोरोना रुग्णांवरही आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी उपचार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारकडून विविध टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. या टास्क फोर्समधील विविध शाखेतील तज्ज्ञांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवरील उपचारांविषयी निर्णय घेण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील आयुष टास्क फोर्सने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून आता राज्य सरकारने कोरोना रुग्णांवर आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार करण्यास मान्यता दिली आहे. तसेच, राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंबंधी प्रमुख मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रकही बुधवारी जाहीर केले.

कोरोना रुग्णांसाठी सरकार युद्धपातळीवर उपाययोजना करीत आहे. मात्र, असे असताना या आजारावर उपचार करण्यासाठी प्रभावी औषध तयार झालेले नाही. हे लक्षात घेऊन आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी डॉक्टरांनी व त्यांच्या विविध संघटनांनी कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधांचा वापर करू देण्याची मागणी सरकारकडे केली होती, त्यानुसार टास्क फोर्सने सूचविलेल्या मार्गदर्शक सूचनांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
याविषयी, आयुष टास्क फोर्सचे सदस्य डॉ. जसवंत पाटील यांनी सांगितले, आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधे हे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. त्यामुळे या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करू शकणार आहेत. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथीकडूनही या उपचारांना मान्यता मिळाली आहे. अ‍ॅलोपॅथी उपचार प्रक्रिया सुरू असताना या औषधांचीही मदत घेता येईल. या उपचार पद्धतीची विशेष बाब म्हणजे प्रत्येक रुग्णाच्या लक्षणांनुसार यात औषधांचा समावेश आहे. सौम्य किंवा मध्यम लक्षणे असतानाच कोरोना रुग्णांवर या उपचार पद्धतीचा अवलंब केल्यास रुग्ण गंभीर स्थितीत जाणार नाही किंवा भविष्यात जीवाला निर्माण होणारा धोकाही टळण्यास मदत होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Now Ayurveda, Unani, Homeopathy treatment even on mild, moderate corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.