No time has passed from the hands of Congress; BJP MP Sambhajiraj claims! | काँग्रेसच्या हातून वेळ गेलेली नाही; भाजप खासदार संभाजीराजेंचा सूचक इशारा !
काँग्रेसच्या हातून वेळ गेलेली नाही; भाजप खासदार संभाजीराजेंचा सूचक इशारा !

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र आयारामांचं नियोजन करताना भाजप नेत्यांमधील खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे. याची सुरुवात भाजपच्या कोट्यातून खासदार झालेले छत्रपती संभाजीराजे यांच्यापासून सुरू झाली का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीक यांनी नुकताच केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत झालेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात संभाजीराजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी भाजपला घरचा आहेर देत काँग्रेसला लढ्यासाठी प्रोत्साहन दिले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले की, काँग्रेस आपले विचार आणि केलेल्या कामांची मांडणी करण्यात कमी पडले हे सत्य आहे. परंतु, अजुनही काँग्रेसच्या हातून वेळ गेलेली नाही. काँग्रेसने आपल्या विचारांची योग्य रितीने मांडणी करावी. आमचे वडिल, लहान भाऊ काँग्रेसमध्येच आहेत. माझं मन कुठय हे सर्वांना ठावूक आहे, असा सूचक इशाराही संभाजी राजे यांनी दिले. परंतु, काम करून घेणे आणि शिवाजी महाराजांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचविणे माझी जबाबदारी आहे. तसेच महाराजांच्या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण दिल्लीत असल्याचं संभाजी राजे म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी २००९ मध्ये तत्कालीन खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांना डावलून संभाजीराजे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी उमेदवारीसाठी महाडीक देखील स्पर्धेत होते. मात्र स्वच्छ प्रतिमा असूनही संभाजीराजेंचा पराभव झाला होता. महाडिक गटाकडून संभाजीराजेंसोबत दगाफटका झाला असे आरोपही त्यावेळी झाले. काही दिवसांनी यासंदर्भात खुद्द आमदार महादेवराव महाडिक यांनीच संभाजीराजेंना मदत न केल्याचा गौप्यस्फोट केला होता. तेव्हापासून संभाजी राजे महाडिकांपासून अंतर ठेवून आहेत. परंतु, आता धनंजय महाडिकच भाजपमध्ये आल्याने संभाजीराजे नाराज असल्याचे दिसून येते. त्या नाराजीतूनच त्यांनी काँग्रेसविषयी आपली भावना बोलून दाखवल्याचे सांगण्यात येते. 

 

Web Title: No time has passed from the hands of Congress; BJP MP Sambhajiraj claims!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.