‘अभिजात दर्जासाठी निकषांची गरज नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 02:48 AM2020-02-28T02:48:12+5:302020-02-28T02:48:23+5:30

परकीय आक्रमणांची पर्वा न करणाऱ्या मराठीचे वैभव मौलिक आहे, ते वाढविण्याचा प्रयत्न करू या, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.

No need of standards to give elite status to marathi language says cm uddhav thackeray | ‘अभिजात दर्जासाठी निकषांची गरज नाही’

‘अभिजात दर्जासाठी निकषांची गरज नाही’

googlenewsNext

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि तो देण्यासाठी मराठी भाषेला निकषांची गरज नाही. अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा आपला हक्कच असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठी भाषा लयाला जात आहे अशी परिस्थिती नसून मराठी भाषेची चिंता करू नका. परकीय आक्रमणांची पर्वा न करणाऱ्या मराठीचे वैभव मौलिक आहे, ते वाढविण्याचा प्रयत्न करू या, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषेच्या गौरवार्थ, भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत मान्यवरांच्या सन्मानार्थ गौरव व पुरस्कार प्रदान सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात गुरुवारी सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर यांची विशेष उपस्थिती होती.

उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी भाषा अनिवार्य कायद्याला दोन्ही सभागृहांत मान्यता मिळाल्याचा आनंद आहे. मराठी भाषेच्या रूपाने आपल्याकडे अमूल्य अक्षरधन आहे ही महत्त्वाची संपत्ती आहे. सध्या सर्वच पुस्तकांपासून दूर जाऊन ‘मोबाइलवेडे’ आणि ‘गुगलगाय’ झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात आपण ‘माहिती’ आणि ‘ज्ञान’ यातला फरक समजून घेतला पाहिजे. त्यामुळे मराठी भाषेची गोडी ही लहानपणापासूनच लावायला हवी. तुम्हा सर्वांचे विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.

मराठी साहित्य निर्मितीत लक्षणीय कामगिरी करणाºया पद्मगंधा प्रकाशनाच्या अरुण जाखडे यांच्या प्रकाशन संस्थेस या वेळी ‘श्री. पु. भागवत पुरस्कार’ देण्यात आला, तर ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा पाटील यांना ‘विंदा करंदीकर जीवन गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा. आर. विवेकानंद गोपाळ यांना ‘डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक’ म्हणून गौरविण्यात आले, तर ‘भाषा संवर्धक’ पुरस्कार अनिल गोरे यांना देण्यात आला. सर्व पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय, यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कारांचेही वितरण मराठी भाषा विभाग सचिव प्राजक्ता लवंगारे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, साहित्य अकादमी विजेते सलीम मुल्ला आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.

‘गोरे’ इंग्रजीला विरोध करतात हा विरोधाभास
भाषा संवर्धक म्हणून पुण्याच्या अनिल गोरे यांना गौरविण्यात आले. त्यांचा उल्लेख मनोगतात करून मुख्यमंत्री म्हणाले, इंग्रजी भाषा आपल्या भाषेवर अतिक्रमण करते असे आपण नेहमीच म्हणतो. पण काळाचा महिमा पाहा की, आता ‘गोरे’ इंग्रजीला विरोध करून मराठीची कास धरत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

Web Title: No need of standards to give elite status to marathi language says cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.