‘करेक्ट कार्यक्रम’... चळवळीचं खळं मोकळं करणारी शरद पवारांची ‘बेरीज’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 09:35 AM2020-06-17T09:35:11+5:302020-06-17T09:45:12+5:30

Sharad Pawar Raju Shetty Meet: ‘कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय,’ असं कारखानदारांच्या छाताडावर नाचत ओरडणारी ऊसपट्ट्यातली पोरं आज गपगुमान आहेत. त्यांना कळेना झालंय की, विधानपरिषदेच्या आमदारकीपायी शेट्टी पवारांच्या दारात का गेले? 

NCP Chief Sharad Pawar's politics behind new bonding with Raju Shetty | ‘करेक्ट कार्यक्रम’... चळवळीचं खळं मोकळं करणारी शरद पवारांची ‘बेरीज’

‘करेक्ट कार्यक्रम’... चळवळीचं खळं मोकळं करणारी शरद पवारांची ‘बेरीज’

googlenewsNext
ठळक मुद्दे‘राष्ट्रवादी’कडून विधानपरिषदेची आमदारकी पदरात पाडून घेण्याचीही तयारी शेट्टी यांनी दाखवली, याची चर्चा ऊसपट्ट्यात सुरू झाली आहे. शेट्टींच्या सभेत पवारविरोधावर फेटे उडवले जायचे. झटक्यात लाखो रुपयांच्या वर्गण्या गोळा व्हायच्या. पवारांच्या शेतीधोरणाच्या विरोधातल्या आंदोलनाचे टोक म्हणजे पवार देशाचे कृषीमंत्री असताना शेट्टींनी काढलेली ‘पंढरपुर ते बारामती’ ही पदयात्रा.

>> सुकृत करंदीकर

शेतकरी संघटनेचे झुंझार नेतृत्त्व राजू शेट्टी यांनी बारामतीच्या गोविंदबागेत जाऊन आमरस पुरीचा आस्वाद घेतला. स्वत: यजमान शरद पवार पंगतीला बसून शेट्टींना आग्रहानं वाढत होते. अर्थात यामुळं कोणाला वाईट वाटण्याचं तीळमात्र कारण नाही. राजकारण आणि समाजकारणातल्या मतभेदांपायी व्यक्तिगत संबंध नासवायचे नसतात. पण आमरसाचा गोडवा घशाखाली उतरवत असतानाच पवारांच्या ‘राष्ट्रवादी’कडून विधानपरिषदेची आमदारकी पदरात पाडून घेण्याचीही तयारी शेट्टी यांनी दाखवली, याची चर्चा ऊसपट्ट्यात सुरू झाली आहे. साहेब पवारांना भेटले नाहीत, असा प्रतिवाद भोळे शेट्टीसमर्थक करत होते, त्याआधीच शेट्टींबरोबरचे बारामतीतले फोटो ट्विट करून शरद पवार मोकळेही झाले.

जिथे ६ वर्षांपूर्वी आंदोलन केलं, तिथेच राजू शेट्टींनी स्वीकारली आमदारकीची ऑफर

‘राष्ट्रवादी’समवेत ‘स्वाभिमानी’चे मैत्रीपर्व सुरु, राजू शेट्टींना 'आमदारकी'ची लॉटरी लागणार

हेच ते शरद पवार ज्यांच्या राजकीय निर्णयांचे वाभाडे काढत शेट्टींनी त्यांची संघटना वाढवली सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी या दुकलीनं पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पट्ट्यात ज्या आक्रमकतेनं पवारविरोध जोपासला तेवढा तर गोपीनाथ मुंडेंनीही पाळला नव्हता. पवार आणि त्यांच्या पक्षाच्या साखर कारखानदारांविरोधात आगपाखड झाल्याशिवाय जयसिंगपुरातली एकही ऊस परिषद कधी पार पडली नाही. याच पवारविरोधावर शेट्टींच्या सभेत फेटे उडवले जायचे. झटक्यात लाखो रुपयांच्या वर्गण्या गोळा व्हायच्या. पवारांच्या शेतीधोरणाच्या विरोधातल्या आंदोलनाचे टोक म्हणजे पवार देशाचे कृषीमंत्री असताना शेट्टींनी काढलेली ‘पंढरपुर ते बारामती’ ही पदयात्रा. राज्यभरातून हजारो शेतकरी या पदयात्रेत सहभागी झाले होते. बारामतीला जोरदार सभा झाली आणि शेट्टी उपोषणाला बसले. ऐन दिवाळीत गोविंदबागेसमोर आंदोलन झाल्याबद्दल पवारांनीही खंत व्यक्त केली होती. 

त्याच गोविंदबागेतली शेतीची प्रगती स्वत: पवारांनी फिरून शेट्टींना दाखवली. त्यातही पवारांचा धूर्तपणा असा की एवढी वर्षे शिवारात गुरगुरत फिरणाऱ्या शेतकरी नेत्याला त्यांनी गपगुमान बारामतीला यायला भाग पाडले. एरवी ही चर्चा मुंबई, पुणे, कोल्हापुर अशी कुठंही होऊ शकली असती. पण पवारांनी हिशोब पूर्ण केला. आजवर ज्या स्वाभिमानानं शेट्टींनी बारामतीचे दौरे केले असतील, तो नीट गुंडाळून ठेवण्यास पवारांनी भाग पाडले आणि सांगलीच्या भाषेत सांगायचं तर ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. ‘कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय,’ असं कारखानदारांच्या छाताडावर नाचत ओरडणारी ऊसपट्ट्यातली पोरं म्हणून तर आज गपगुमान आहेत. एरवी शेट्टींच्या विरोधात एक जरी वावगा शब्द आला तर सोशल मीडियात त्या विरोधात तुटून पडणारी ऊसपट्ट्यातली पोरं आज एकदम शांत आहेत. कारण त्यांना कळेना झालंय की, विधानपरिषदेच्या आमदारकीपायी शेट्टी पवारांच्या दारात का गेले? 


 
अर्थात राजकीय कोलांटउड्या हे शेट्टींच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य राहिले आहे. ‘शेतकऱ्यांचे पंचप्राण’ असे म्हणत शेट्टी यांनी शरद जोशींना गुरुस्थानी मानले. ‘जोशीसाहेबांच्या विद्यापीठाचा मी विद्यार्थी. ते नसते तर गावकुसाबाहेरसुद्धा मला कोणी ओळखले नसते. त्यांचे संस्कार झाले म्हणूनच मी संसदेपर्यंत पोहोचलो,’ या शब्दात शेट्टी शरद जोशींबद्दलचे ऋण व्यक्त करतात. जोशींनी जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी दिलेली राज्यसभेची खासदारकी स्वीकारली तेव्हा, ‘जोशींनी जातीयवादी गिधाडांशी मैत्री केली,’ असे सांगत शेट्टींनी स्वाभिमानीची वेगळी चूल मांडली. पुढे याच शेट्टींनी २०१४ मध्ये स्वत:च नरेंद्र मोदी यांचा प्रचार केला. भाजपाच्या पाठींब्यावर लोकसभेत निवडून गेले.

...मग ज्यांचे प्राण गेले ते चुकीचे होते का? सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर घणाघात

सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे, सत्तेची सूत्रं पवारांकडे... कोण ऐकणार काँग्रेसचे साकडे?

भाजपासोबतचा त्यांचा मधुचंद्र तीन वर्षे टिकला. त्यांचेच कधीकाळचे जीवलग सहकारी ‘स्वाभिमानी’चे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळवून देण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. देवेंद्र फडणवीसांनी खोतांना नुसती आमदारकीच नव्हे तर राज्यमंत्रीपदही दिले. खोतांच्या डोक्यावर लाल दिवा आल्यानंतर शेट्टी-खोत यांच्यात अंतर पडत गेले. खटका उडाला आणि खोतांनी स्वत:ची वेगळी संघटना काढली. यानंतर शेट्टींना दिल्लीत जाऊन राहुल गांधींची भेट घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी ‘एनडीए’च्या शिवारातून ‘युपीए’च्या शिवारात दाखल झाले. हातकणंगलेत भाजप-शिवसेनेने एकत्र येत शेट्टींना पराभवाची चव चाखायला लावली. त्याआधी जिल्हा परिषद सदस्य, आमदार, दोनदा खासदार अशा सलग निवडणुका त्यांनी जिंकल्या होत्या. त्या अर्थाने सुमारे दोन दशकानंतर पहिल्यांदाच शेट्टी ‘लोकप्रतिनिधी’ उरले नाहीत. त्यामुळे कदाचित ते अस्वस्थ असतील. बारामतीचा दौरा त्यातूनच घडला असावा. 

‘राष्ट्रवादी’च्या कोट्यातून आमदार होण्यासंदर्भात स्वत: शेट्टी अजून बोलले न अद्याप वक्तव्य केलेले नाही. परंतु, हे उघड गुपीत असल्याचे त्यांचेच निकटवर्तीय सांगतात. शेट्टी उद्या आमदार होतीलही. पण मग स्वाभिमानीतल्या दुसऱ्या फळीचं काय? सदाशिव खोतांना कोणत्या तोंडानं आता बोलावं? याची उत्तरं शेट्टी समर्थकांना आता शोधावी लागतील. पाशा पटेल, रघुनाथ पाटील, लक्ष्मण वडले, सदाशिव खोत आणि आता राजू शेट्टी...ही सगळे शेतकरी संघटनेच्या मुशीत घडलेले शेतकरी नेते. वेगवेगळ्या कालखंडात ही मंडळी त्यांच्या-त्यांच्या सोईच्या पक्षांच्या वळचणीला गेली आणि स्वत्व हरवून बसली. यात चळवळ संपत गेली. यशवंतराव चव्हाण यांनी शेतकरी कामगार पक्षातल्या मातब्बर नेत्यांना काँग्रेसमध्ये आणून ‘बेरजेचं राजकारण’ हा शब्दप्रयोग रुढ केला. या राजकारणानं नेहमीच प्रस्थापितांचं चळवळींवरचं वर्चस्व कायम ठेवलं. व्यक्तिगत खोत, शेट्टींचं जे व्हायचं ते होईल. यशवंतराव चव्हाण म्हणाले तसं - ‘‘राजकारण आणि समाजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही. अथवा संपवतही नाही.’’ हे अगदी खरंच. पण चळवळी करणारी माणसं, चळवळी जिवंत ठेवणारी माणसं रातोरात उठून छावण्या बदलतात तेव्हा चळवळी नेस्तनाबूत होतात. बारामतीत जाऊन पवारांचा पाहुणचार घेणाऱ्या शेट्टींना पाहिल्यानंतर ऊसपट्ट्यातल्या शेतकरी आज सैरभैर झालाय तो याचमुळं. साखर कारखानदारांच्या लाठ्याकाठ्या, रक्तपात, पोलिस केस, आंदोलनं हे सगळं कशासाठी होतं? उद्या आमदारकी स्वीकारली तरी त्याचा गुलाल उडवण्याचं धाडस स्वत: शेट्टीही करु शकणार नाहीत.

Web Title: NCP Chief Sharad Pawar's politics behind new bonding with Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.