ईव्हीएममध्ये नव्हे, तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 04:11 PM2019-06-10T16:11:25+5:302019-06-10T16:15:01+5:30

शरद पवारांनी व्यक्त केला संशय

ncp chief sharad pawar express doubts over electoral officers during counting of votes | ईव्हीएममध्ये नव्हे, तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड- शरद पवार

ईव्हीएममध्ये नव्हे, तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड- शरद पवार

Next

मुंबई: ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता निवडणूक अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये अडचण नसून निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड होत असल्याचा संशय पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या 20 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 




मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या घोटाळ्याच्या खोलात जाणार असल्याचं शरद पवार म्हणाले. 'मतदार ज्या ठिकाणी मतदान करतात, त्या ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये काहीच घोटाळा नाही. पण ज्यावेळी ईव्हीएम निवडणूक अधिकाऱ्यांच्या हाती जाते. त्यांच्याकडून मतमोजणी केली जाते, त्यावेळी काहीतरी गडबड होते. आम्ही काही तंत्रज्ञांशी आणि विरोधकांशी चर्चा करून या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत,' असं शरद पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले. 




मतदान आणि मतमोजणीतील घोटाळा लोकांच्या लक्षात आल्यास लोक कायदा हातात घेतील, अशी भीती पवारांनी व्यक्त केली. 'आपण दिलेलं मत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला जात नसल्याचं लोकांच्या लक्षात आल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल. लोक आता शांत राहतील. पण भविष्यात असं घडल्यास माणसं कायदा हातात घेतील आणि आम्ही ते होऊ देणार नाही,' असं शरद पवार यांनी म्हटलं. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पवारांनी ईव्हीएमवर भाष्य करताना बारामतीचा उल्लेख केला होता. बारामतीत भाजपा जिंकल्यास लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडेल, असं म्हणत शरद पवारांनी ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केला होता. 

Web Title: ncp chief sharad pawar express doubts over electoral officers during counting of votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.