“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:52 IST2025-12-09T16:51:57+5:302025-12-09T16:52:19+5:30
NCP Ajit Pawar Group News: अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना ही संकल्पना मांडली. त्यामुळेच निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणींचा आधार मिळाला, असा दावा नेत्यांनी केला आहे.

“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
NCP Ajit Pawar Group News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत आहे. योजनेची घोषणा झाल्यापासूनच विरोधक सातत्याने यावर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीत २१०० रुपये देण्याचा शब्द महायुतीने दिला होता. परंतु, तो अद्याप पूर्ण न केल्याबाबत निशाणा साधला जात आहे. यातच ही योजना नेमकी कुणी आणली, यावरून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधानपदी मराठी माणूस बसू शकतो, असा दावा केला. यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. २०२९ मध्येही पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हेच असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाच्या नेत्याने यानंतर महाराष्ट्रात अजितपर्व येईल, असा दावा केला आहे. तसेच लाडकी बहीण योजनेवरूनही विधान केले. अजित पवार रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, असा टोलाही लगावला.
नव्या कथेचा नवा अध्याय बाकी?
महिनाभरात पंतप्रधानपदी मराठी माणूस बसू शकतो, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. त्यावर आ. अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रात अजितपर्व येईल, असे भविष्य वर्तविले. 'अजित पवार आरोपांनी विचलित न होता काम करतात. ते कधी रुसून बारामतीला गेले नाहीत', असेही म्हणत मिटकरींनी टोला लगावला. 'अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना ही संकल्पना मांडली. त्यामुळेच निवडणुकीत महायुतीला लाडक्या बहिणींचा आधार मिळाला', असा दावाही त्यांनी केला. एकीकडे भाजप आणि शिंदेसेना ही योजना आपल्याच नेत्यांनी आणल्याचे सांगत असताना मिटकरी यांच्या दाव्यामुळे नेमकी योजना कुणाची? की नव्या कथेचा नवा अध्याय बाकी आहे? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हीच राज्यातील सर्व सरकारी योजनांपैकी सर्वात लाडकी असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. त्यातही खास गोष्ट म्हणजे, महिलांसाठी फायदेशीर असलेल्या या योजनेला पुरुषवर्गातूनही उघडपणे पाठिंबा मिळताना दिसतो आहे. या सर्वेक्षणात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेला सरासरी ५० टक्के नागरिकांची पसंती मिळाली आहे. केवळ महिलांचा विचार केल्यास, ५३ टक्के महिलांनी ही योजना सर्वाधिक पसंतीची असल्याचे सांगितले आहे. तर पुरुषवर्गातूनही तब्बल ४६ टक्के पुरुषांनी या योजनेला आपला पाठिंबा दर्शवला आहे.