सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 14:55 IST2025-12-07T14:40:10+5:302025-12-07T14:55:53+5:30
राज्य दिवाळखोरीला निघाले आहे. मोठ्या शहरात निधी वळवला जातो. छोट्या शहरांना विकासापासून वंचित ठेवले जाते. विदर्भाकडेही दुर्लक्ष केले जात आहे यासारख्या विविध आरोपांनी विरोधकांनी महायुती सरकारला घेरले.

सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
नागपूर - १९८० मध्ये भाजपाचे १४ आमदार होते, १९७५ मध्ये १६ आमदार होते तेव्हाही विरोधी पक्षनेते देण्यात आले होते. परंतु आताच्या सरकारला विरोधकांची भीती वाटते का? विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेऊन चहापानाला बोलावत असतील तर त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. नागपूर हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. त्याआधी सरकारकडून विरोधकांना चहापानाचं आमंत्रण देण्यात आले. त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. नागपूरात विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर निशाणा साधला. विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव यांनी ही पत्रकार परिषद घेतली.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र वारंवार सरकारकडून तारीख पे तारीख देण्याचं काम करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. केंद्राकडे अतिवृष्टीसाठी प्रस्ताव पाठवला नाही असं पुढे आले. राज्याला केंद्राकडून अद्याप कुठलीही मदत मिळाली नाही. राज्यात शेतकऱ्यांचा अवमान करण्यासाठी महायुती नेत्यांची चढाओढ सुरू आहे. अजित पवार असतील राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांविरोधी विधाने केली. राज्यातील तिजोरी खाली झाली आहे. ९ लाखाहून अधिक कर्ज राज्यावर आहे. उत्पन्नाचा मोठा वाटा कर्ज परतफेडीवर जात आहे. महसूल तूट वाढली आहे. निधी वाटपात मोठ्या प्रमाणात असमानता होत आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच राज्य दिवाळखोरीला निघाले आहे. मोठ्या शहरात निधी वळवला जातो. छोट्या शहरांना विकासापासून वंचित ठेवले जाते. विदर्भाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. सरकार पुरवणी मागण्यात मोठ्या रक्कमा सांगत आहेत. लाडकी बहीण म्हणून पाठ थोपवणाऱ्या बहिणींच्या सुरक्षेकडे सरकारचे लक्ष नाही. महिलांवरील अत्याचार वाढले आहे. दररोज २४ मुलींवर अत्याचार, छळाचे गुन्हे नोंदवले आहे. लहान मुलींवरील अत्याचारात महाराष्ट्र नंबर एकवर आहे. २०२१ मध्ये १०४२८ गुन्हे नोंदवले गेले. २०२२ मध्ये ८३५५, २०२३ मध्ये ९५७० आणि २०२५ मध्ये आतापर्यंत २ हजाराहून अधिक गुन्हे नोंदवले गेलेत. महिला सुरक्षेत सरकार अपयशी ठरले आहे. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी अशा हत्या झाल्या आहेत. देशमुख प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही बेपत्ता आहे असा आरोप विरोधकांनी केला.
दरम्यान, मागच्या अधिवेशनापासून आतापर्यंत विदर्भात ७५ लोकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. २०२० ते २०२४ या कालावधीत २१८ मृत्यूची नोंद आहे. २०२५ मध्ये नाशिक, पुणे येथे बिबट्यांच्या हल्ल्यात हजारो नागरीक जखमी झाले. सरकारकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कंत्राटदारांच्या आत्महत्या, बेरोजगार युवक आत्महत्या करतायेत. ११ वर्षाच्या भाजपा कालावधीत विदर्भात रोजगारासाठी युवकांना का भटकावे लागते याचे उत्तर सरकारकडे नाही. सत्तेचा उपयोग कुणासाठी आहे हा प्रश्न जनतेला पडला आहे. राज्यात ७ लाख कोटींच्या जमिनी अदानींच्या घशात घातल्या आहेत. कवडीमोल भावात या जमिनी दिल्या गेल्या. पुण्यातही सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न केला अशा विविध आरोपांनी विरोधकांनी सरकारला घेरले आहे.