ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 08:48 IST2025-12-09T08:47:50+5:302025-12-09T08:48:59+5:30
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे असं म्हणत अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूर येथे सुरुवात झाली. पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याशिवाय हे अधिवेशन पार पडत आहे. त्यातच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओत नोटांचे बंडल घेऊन एक आमदार दिसत असल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. दानवे यांनी या व्हिडिओवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे आमदार कोण आहेत असा प्रश्न विचारला आहे.
अंबादास दानवे यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत म्हटलंय की, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सत्ताधारी आमदार या व्हिडिओत दिसत आहे. त्यात पैशांच्या गड्ड्यांचा ढीग लावल्याचा दिसत आहे. याआधीही मंत्री संजय सिरसाट यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात पैशाने भरलेली बॅग दिसत होती. हे आमदार कोण हे आता शोधावे लागेल. पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde@Dev_Fadnavis@AmitShah@BJP4Maharashtra#Moneypower#ruins#Maharashtrapic.twitter.com/WUDpmedTgo
तर आम्ही ३ पक्ष सत्ताधारी आहोत, त्यात आमदार कोण हे कळले पाहिजे. अंबादास दानवेंची शोध मोहिम आहे, त्यांना हे कसे कळले हेदेखील पाहायला हवे. ३ पक्षातील कोण आमदार आहे, कसले पैसे आहेत आणि वस्तूस्थिती तपासणे गरजेचे आहे. अंबादास दानवेंकडे सध्या काही पद नाही. विरोधी पक्षनेते नाहीत, आमदार नाहीत त्यामुळे त्यांची शोधमोहिम चालू असेल. जी वस्तूस्थिती असेल त्याला आम्ही सामोरे जाऊ असं सांगत शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी दानवे यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, या व्हिडिओत दिसणारे आमदार शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओवरून दळवी यांनी दानवे यांच्यावर घणाघात केला. मला बदनामी करण्याची सुपारी अंबादास दानवे यांना कुणी दिली हे त्यांनी सांगावे. हा व्हिडिओ माझा नाही. दानवे यांनी खरे दाखवावे. ते सुपारीबाज नेते आहेत. जर पैशाचे आरोप सिद्ध झाले तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. पैशांची बंडल घेणारी ती व्यक्ती कोण हे लोकांसमोर आले पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ समोर आला आहे. दानवे यांनी अधिकृतपणे पटलावर माहिती ठेवावी. अंबादास दानवे ब्लॅकमेलिंग करण्याचे काम करतात. सभागृहात कोण प्रश्न विचारतील त्यांना उत्तर देण्याची माझी नक्की तयारी आहे. व्हिडिओ कॉलमधील तो व्यक्ती कोण आणि त्याच्याशी काय संवाद झाला हे दानवेंनी सांगावे असं सांगत आमदार महेंद्र दळवी यांनी हे आरोप फेटाळले.