आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:38 IST2025-12-02T12:23:27+5:302025-12-02T12:38:25+5:30
राज्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतचीच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदानाच्या गोपीनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
राज्यात आज नगर परिषदा आणि नगर पंचायतसाठी मतदान सुरू आहे. अनेक नेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावल्याचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.
मोठी बातमी! राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
हिंगोली शहरातील बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक ३ येथे आमदार बांगर यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी मतदान कक्षात जाऊन प्रत्यक्ष बटन दाबताना एका महिला मतदाराला माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच यावेळी केंद्रात घोषणा दिल्याचा आरोपही केला आहे. “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणाबाजी केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
तसेच मतदान केंद्रात संतोष बांगर यांनी मोबाईल फोन वापरल्याचे दिसत आहे. मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, मोबाईल फोन वापरणे किंवा कुठल्याही प्रकारे निवडणूक गोपनीयतेचा भंग करणे हे आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने अहवाल मागविण्यात आला आहे.गोपनीयतेचा भंग झाल्याचे प्राथमिक अहवालात आढळल्यास आमदार संतोष बांगर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.