Marathwada politics changed with the deprived alliance | वंचित आघाडीने बदलले मराठवाड्याचे राजकारण
वंचित आघाडीने बदलले मराठवाड्याचे राजकारण

ठळक मुद्दे नरेंद्र मोदी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहून मतदान झाले.राजकारणात ‘वंचित’चे महत्त्व वाढणार

-सुधीर महाजन

मराठवाड्यातील निकालांचे वैशिष्ट्य म्हणजे अशोक चव्हाण आणि चंद्रकांत खैरे या दोन दिग्गजांचा पराभव. तसेच पहिल्यांदाच मराठवाड्यातून काँग्रेसचा एकही खासदार नाही. मोदी लाटेत नांदेडची जागा काँग्रेसने गमावणे आश्चर्य नाही; पण औरंगाबादसारखी शिवसेनेची महत्त्वाची जागा एमआयएमने हिसकावणे ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे. हा पराभव सेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. कारण मुंबईबाहेर शिवसेनेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ औरंगाबादेतच रोवली गेली होती.


गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही नांदेडची जागा काँग्रेसने राखली होती; परंतु यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय प्रयोगाने काँग्रेसच्या राजकारणाचा ताळेबंदच बाद ठरवला. त्याचा फायदा भाजपने उठवला. हे चित्र महाराष्ट्रभर दिसले. धर्मनिरपेक्ष मतांच्या विभाजनाचा फटका काँग्रेसला बसला. अशोक चव्हाणांचा पराभव झाला असला तरी त्यांना साडेचार लाख मते मिळाली. या गोष्टीकडे कानाडोळा करता येणार नाही. यावेळी पहिल्यांदाच भाजप आणि वंचित आघाडी या दोन्ही पक्षांना मिळालेली मते ही पक्षाकडे न पाहता नरेंद्र मोदी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहून मतदान झाले. या ठिकाणी पक्षाचा उमेदवार दुय्यम ठरला. गेल्या निवडणुकीत ‘अशोकराव पाहिजेत’ या मुद्यावर मतदान झाले होते. यावेळी हा मुद्या गायब होता. ‘वंचित’च्या उदयामुळे काँग्रेसच्या परंपरागत मतदाराचे विभाजन ही बाब निर्णायक ठरली.


नांदेडमध्ये पाटील, देशमुख वाद ऐन निवडणुकीत उफाळून आला. त्याचाही फटका बसला. नांदेडमधील काँग्रेस व भाजपला मिळणाऱ्या मतांचा १९९७ पासून आढावा घेतला तर ही मते सारखीच आहेत. २००४ साली काँग्रेसच्या मतांच्या विभाजनामुळे भास्करराव पाटील खतगावकर पराभूत झाले होते, त्याची पुनरावृत्ती यावेळी झाली. पाच टक्के नवामतदार भाजपकडे झुकला.


औरंगाबादेत खैरेंचा पराभव अपेक्षाभंग करणारा अजिबात नव्हता. जनतेला गृहीत धरण्याची प्रवृत्ती हे पराभवाचे मूळ कारण आहे. गेल्या वर्षभरात कचरा, पाणी, रस्ते या समस्यांनी औरंगाबादचे नागरिक त्रस्त आहेत आणि या समस्यांवर अजुनही उपाय योजले नाहीत. शिवाय महानगरपालिकेतील अनागोंदी या सगळ्यांचा फटका खैरेंना बसला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आळसावलेली शिवसेना. त्याचा परिणाम झालाच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंच्या मतांचे विभाजन झाले. एम.आय.एम.चे इम्तियाज जलील यांनी औरंगाबादेतून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. त्यांच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातच शिवसेनेचा बालेकिल्ला समजली जाणारी गुलमंडी येथे. तेथेच त्यांनी सेनेचा पराभव केला; पण या पराभवातून सेनेने धडा घेतला नाही.


‘वंचित’चे महत्त्व वाढणार
मराठवाड्यात उर्वरीत जागांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले. हिंगोलीत गेल्या वेळेस काँग्रेसचे राजीव सातव निसटत्या बहुमताने विजयी झाले होते आणि आता ते उमेदवारही नव्हते. त्यामुळे हिंगोली काँग्रेसने गमावली. रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे जिंकणार हे अधोरेखीत होतेच. उस्मानाबादेत सेनेने उमेदवार बदलला त्याचा फायदा झाला. बहुजन वंचित आघाडीने मराठवाड्यातील राजकारणाचे समीकरण बदलून टाकले, याची झलक मोदी त्सुनामीतही पहायला मिळाली; पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे महत्त्व आणखी निश्चितच वाढणार.


Web Title: Marathwada politics changed with the deprived alliance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.