मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 07:19 IST2025-06-11T07:18:41+5:302025-06-11T07:19:01+5:30
Toll Collection: महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी पाचशे ते हजार कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या, तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे.

मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
- चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी पाचशे ते हजार कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या, तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे.
केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग बांधण्यावर आलेला खर्च वसूल झाल्यानंतर टोल टॅक्स घेता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यानंतरही टोल टॅक्स वसुलीची रक्कम दरवर्षी पाचशे ते हजार कोटींनी वाढत आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ (फेब्रुवारी २५ पर्यंत) या मागील पाच वर्षांत देशात २ लाख २० हजार ५९० कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातून २७ हजार १४ कोटी रुपयांचा टोल वसूल केला गेला. यानंतर राजस्थानमधून २४,२०९ कोटी, महाराष्ट्रातून २१,१०५ कोटी आणि गुजरातमधून २०,६०७ कोटींची टोल वसुली झाली.
वसुलीची रक्कम वाढतीच
टोल वसुलीची रक्कम दरवर्षी वाढत आहे. २०२०-२१ मध्ये टोल नाक्याचे उत्पन्न २७,९२६ कोटी रुपये होते. २०२१-२२ मध्ये यात ६००२ कोटी, २०२२-२३ मध्ये १४,१०४ कोटी आणि २०२३-२४ मध्ये ७८५० कोटी रुपयांचा टोल वसूल केला. २०२४-२५ फे. पर्यंत ५४,८२० कोटींचा एकूण टोल वसूल केला गेला.
महाराष्ट्रात किती टोल नाके
महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावर ७५ पेक्षा जास्त टोल नाके आहेत. मागील पाच वर्षांत मराठी माणसाने २१,१०५ कोटी १८ लाख रुपयांचा टोल दिला आहे.
महाराष्ट्रात टोल वसुली
२०२०-२१ २५९०.८५
२०२१-२२ ३३८६.२१
२०२२-२३ ४६६०.२१
२०२३-२४ ५३५२.५३
२०२४-२५ ५११५.३८
रक्कम कोटीत/(फेब्रुवारीपर्यंत)