Maratha Morcha aggressive on issue of Maratha reservation | आरक्षण लढ्यातील हुतात्मांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी द्या : मराठा मोर्चा

आरक्षण लढ्यातील हुतात्मांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी द्या : मराठा मोर्चा

मुंबई - मराठा क्रांती ठोक मोर्चाने पुन्हा एकदा  आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाच्या वतीने 58 शिस्तबद्ध मुकमोर्चे काढले होते. आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना 42 मराठा बांधवांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. या हुतात्मांच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत सामावून घ्या, यासह इतर मागण्यांसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे.

मराठा आरक्षणासाठी हुतत्मा झालेल्या मराठा बांधवाच्या कुटुंबातील एकाला नोकरी, 10 लाख रुपये आर्थिक मदत, अरबी समुद्रातील बहुचर्चित शिवस्मारकाच्या उभारणीसाठी प्रयत्न करावे, अशी मागणी औरंगाबाद येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.  

दरम्यान राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूर आणि सातारा येथील गादीला मान आहे. मात्र राजकीय फायद्यासाठी अनेक पक्षाचे वरिष्ठ नेते महाराजांच्या वंशजाना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखत असून हे थांबविण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून कऱण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला बजेट देण्यात यावे आणि जाचक अटी कमी कराव्या. तसेच सारथी संस्थेचे कार्यालय पुण्यात आहे. मात्र याची खरी गरज दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी आहे. त्यामुळे सारथीचे सेंटर औरंगाबादमध्ये द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अन्यथा, 9 ऑगस्ट रोजी मराठा बांधव मुंबईत आंदोलन करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. 
 

Web Title: Maratha Morcha aggressive on issue of Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.