‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:08 IST2025-12-09T16:07:36+5:302025-12-09T16:08:17+5:30
Manoj Jarange Patil News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लवकरात लवकरत न्याय द्यावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

‘त्या’ दिवशी आधी जिल्हा, मग राज्य बंद करण्यात येईल; संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Patil News: मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख प्रकरणी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले असून, मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आम्ही एक आहोत. एका लेकीला आणि एका लेकाला आपला बाप दिसत नाही. आरोपी तातडीने फासावर गेल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
क्रूर हत्या करणारे बाहेर फिरतात, कृष्णा आंधळे कुठे आहे? ज्या दिवशी या प्रकरणातील आरोपी सुटेल त्या दिवशी हा जिल्हा पूर्ण बंद ठेवायचा, त्यानंतर राज्य बंद ठेवण्यात येईल. राज्यात चाक फिरणार नाही. आधी या प्रकरणाच्या तपासाचा वेग योग्य वाटत होता, कारण त्यावेळेस फडणवीस यांनी शब्द दिला होता. फडणवीस यांच्या एका शब्दावर सगळे लोक शांत बसले होते. एक वर्षाच्या आत या प्रकरणातील आरोपींना फासवर लटकवू, असा शब्द दिला होता. मात्र, या प्रकरणात दिरंगाई होत आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
सरकारने हा विषय चार-पाच महिन्याच्या आत संपवावा
क्रूर हत्या करणारे सापडत नाहीत. आंधळेने मारतानाचे व्हिडिओ कॉल केले आहेत, तो पकडला की या प्रकरणाचा मोठा उलगडा होईल. सरकारने हा विषय चार-पाच महिन्याच्या आत संपवावा. पुढे कुटुंबांनी हाक दिल्यास आम्ही कशाचा विचार करणार नाहीत. ओबीसीचे नेते कितीतरी आहेत त्यांना मोठे करा. अशा क्रूर लोकांना सांभाळत असाल तर आम्हाला अजित दादाचा राग येणार, तुम्ही चुकीच्या माणसाला जवळ करत आहात, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लवकरात लवकरत न्याय द्यावा, अशी मागणी करत, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. त्याच्यानुसार यंत्रणा सुरू आहे का? सरकार तर त्याला मार्गदर्शन करत नाही ना, असा संशय मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. तसेच परळी आणि बीडमध्ये वाल्मिक कराड या प्रकरणातून सुटणार असल्याच्या अफवा पसरवण्यात येत असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला.