Mahayuti: भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:17 IST2025-12-09T10:13:55+5:302025-12-09T10:17:29+5:30
Mahayuti 2029 elections: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपला कुबड्यांची गरज नाही असे विधान केले होते. त्यावरून भाजप २०२९मध्ये स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. याबद्दल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.

Mahayuti: भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..."
ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानामुळे भाजप २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची स्वबळावर तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. 'भाजप हा कुणाच्या कुबड्या घेऊन चालणारा पक्ष नाही, स्वबळावर चालतो', या विधानांचे वेगवेगळे अर्थ लावले जात असून, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली.
एका वृत्तवाहिनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत '२०२९ मध्ये भाजपने एकटं लढायचं आहे. भाजपने बिना कुबड्यांचं लढायचं आहे, ही वाटचाल सुरू आहे का?', असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला.
भाजप एकटा ताकद वाढवतोय असे नाही
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "नाही. २०२९ मध्ये भारतीय जनता पक्ष आपल्या मित्रपक्षांसोबतच लढेल. पण, आपली शक्ती वाढवणं गरजेचंच असतं. तिन्ही पक्ष वाढवत आहे. एकटा भाजप वाढवतोय असे नाही."
"शेवटी आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. आमचे कार्यकर्ते, आमचे ध्येय धोरणे हे वेगवेगळे आहेत. आम्ही समान गोष्टींवर एकत्र आलो आहोत, त्यामुळे आपली शक्ती वाढवणे हे कुठेच गैर नाहीये. त्यांनी वाढवणं गैर नाहीये आणि आम्ही वाढवणेही गैर नाहीये. पण, २०२९ मध्येही आम्ही आमच्या मित्रपक्षांना सोबत घेऊनच लढणार आहोत", असे भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.
एकनाथ शिंदे नाराज नाहीत, पण प्रॉब्लेम काय होतोय की...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चेला त्यांच्या दिल्ली दौऱ्याने तोंड फुटले होते. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "शिंदे नाराज नाहीत. हे त्यांनीही सांगितलं आहे. प्रॉब्लेम असा होतोय की, मी आणि शिंदे एका हेलिकॉप्टरने आलो. आम्ही गप्पा मारल्या. मग गाडीत बसलो. एका गाडीत बसून गप्पा मारल्या."
"आता आम्ही मंचावर बसलो. मग ते त्यांच्या विचारात, मी माझ्या विचारात, त्यांनी भाषण केलं. मी भाषण केले. त्याचे व्हिडीओ काढले आणि बघा दोघे एकमेकांना बोललेच नाहीत. मी शिंदेंना सांगितलं की आपल्याला काम असो की नसो, आपल्याला बोललं पाहिजे नाही, तर तेच व्हिडीओ चालतात", असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदेंच्या नाराजीबद्दल दिले.