हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:27 IST2025-12-09T15:26:48+5:302025-12-09T15:27:36+5:30
Winter Session Maharashtra 2025: नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती फुटल्याचे दिसले असले तरी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाल्याचे म्हटले जात आहे.

हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!
Winter Session Maharashtra 2025: हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीवरून रंगलेली चर्चा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वेगळ्याच वळणावर नेली. एक पक्ष दोन गटाच्या सरकारमध्ये एका गटाचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागले आहेत. ते मुख्यमंत्र्याच्या इशाऱ्यावर नाचतात, असा दावा केला. त्याचा धसका गटाच्या नेत्याने घ्यायला पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. यावरून विधिमंडळ परिसरात चांगलीच चर्चा रंगली.
या चर्चेत शिंदेसेनेच्या नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनीही आपली स्पष्टोक्ती देत ते आमचेच आमदार असल्याचे सूतोवाच करीत आदित्य ठाकरेंच्या दाव्याला पूर्णविराम दिला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिंदेसेना खरी शिवसेना आहे. तो आमचा मित्रपक्ष आहे. त्यांचे आमदार घेऊन आम्ही काय करणार, ते आमचेच आमदार आहेत, असे राजकारण आम्ही करीत नाही. उलट शिंदेसेना मजबूत व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तत्पूर्वी अलीकडेच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत बरेच मानापमानाचे प्रसंग घडल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र लढले. परंतु, अधिवेशनात पुन्हा हम साथ साथ हैं, अशी भूमिका फडणवीस आणि शिंदे यांनी घेतल्याचे पाहायला मिळत असून, याबाबत राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
अधिवेशनात हम साथ साथ है...?
नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुती फुटली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेने बहुतांश ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कमळावरच बाण ताणला. दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना हिम्मत देण्यासाठी कुठलीही कसर सोडली नाही. हे दोन्ही पक्ष एवढ्या तीव्रतेने निवडणूक लढले की काँग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादी मैदानात आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला. काही प्रसंग तर असे घडले की मतदानानंतर महायुती तुटेल की काय असे वाटायला लागले. हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटतील, असेही वाटत होते. पण, अधिवेशनात तर फडणवीस व शिंदे यांनी 'हम साथ साथ है'ची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. दोघांमध्येही समन्वय दिसत आहे. हे चित्र पाहता निवडणुकीत या दोन्ही नेत्यांनी ठरवून कुस्ती आणि चित मात्र विरोधकांना केले, असेच अनेकांना वाटू लागले आहे, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, शिंदेसेनेचे २२ आमदार मुख्यमंत्र्यांच्या गळाला लागले आहेत, अशी माहिती विधिमंडळ परिसरात आदित्य ठाकरेंनी दिली. मुळात त्यांना माहिती देणारे सूत्रच चुकीचे आहे. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद, मनभेद नाहीत. आमच्या आमदारांवर आमचा विश्वास असून, ते कुठेही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधिमंडळ परिसरात दिली.