Maharashtra Weather Update: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 06:00 IST2025-06-17T05:57:39+5:302025-06-17T06:00:34+5:30
Maharashtra Weather News in Marathi: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मध्यम पाऊस तर विदर्भ कोरडाच; जगबुडी, अर्जुना, काेदवली नद्या इशारा पातळीवर; कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत ७ फुटांनी वाढ

Maharashtra Weather Update: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
१८ दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, तर उर्वरित विदर्भात हवामान कोरडे होते.
रत्नागित जगबुडी, अर्जुना व काेदवली नद्यांचे पाणी इशारा पातळीवर पाेहाेचले हाेते. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पातळी सात फुटांनी वाढली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नदी-नाल्यांना पूर येऊन वाहतूक ठप्प झाली.
१ ते १६ जून दरम्यानचा पाऊस
कोकण- २२ टक्के
मध्य महाराष्ट्र- १ टक्का
मराठवाडा- २६ टक्के
विदर्भ- ६१ टक्के
भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळाले
२२ जूनपर्यंतचा अंदाज
कोकण, पश्चिम महाराष्ट्र - घाट परिसरात चांगला पाऊस
मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा - विखुरलेल्या स्वरूपाचा
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी विदर्भात मान्सून हवा तसा सक्रीय होत नसल्याने चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.
मृग संपायला पाच दिवस शिल्लक असताना हवामान प्रणाली तयार हाेत नसल्याने हे नक्षत्र देखील काेरडेच जात आहे. पावसाअभावी पेरणी खाेळंबल्याने शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. मूग, उडीद व बरबटी ही पिके पेरणीचा काळ निघून गेला आहे. १६ जूनपासून विदर्भात मान्सून सक्रिय हाेईल, अशी हवामान प्रणाली तयार झाली हाेती. मात्र, दाेन दिवसांपूर्वी या प्रणालीत पुन्हा बदल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पुढील आठवड्यात पाऊस विखुरलेलाच असेल.
मराठवाड्यात ३ टक्के पेरणी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झाली अन् बळीराजा पेरता झाला.
मागील आठ दिवसांत मराठवाड्यात
एक लाख ४९ हजार ५०९ हेक्टरवर खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
सध्या पेरणीची घाई नको...
अद्याप ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.