महाराष्ट्र निवडणूक 2019: 'सत्ता स्थापनेसाठी भाजपा अपक्ष आमदारांसमोर भीक मागतेय'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 07:41 AM2019-10-30T07:41:01+5:302019-10-30T07:41:25+5:30

Maharashtra Election Result 2019: काँग्रेस खासदाराची भाजपावर जोरदार टीका

Maharashtra Vidhan Sabha Result BJP begging before independent MLAs to form government says Ghulam Nabi Azad | महाराष्ट्र निवडणूक 2019: 'सत्ता स्थापनेसाठी भाजपा अपक्ष आमदारांसमोर भीक मागतेय'

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'सत्ता स्थापनेसाठी भाजपा अपक्ष आमदारांसमोर भीक मागतेय'

googlenewsNext

नवी दिल्ली: भाजपा सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आमदारांसमोर भीक मागत असल्याची टीका काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणूक निकालावरुन आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं आहे. 

नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालाबद्दल मला मतदारांचं अभिनंदन करायचं आहे. हरयाणा असो वा महाराष्ट्र किंवा देशात अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुका असोत, भाजपाचा पूर्णपणे पराभव झाला आहे. त्यांना चौटाला आणि अपक्ष आमदारांसमोर सत्ता स्थापन करण्यासाठी भीक मागावी लागत आहे. महाराष्ट्रात तर त्यांना अद्यापही सत्ता स्थापन करता आलेली नाही, अशा शब्दांत आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं. 

निवडणुकीच्या तोंडावर मूळ मुद्द्यांपासून मतदारांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातो, असं आझाद म्हणाले. 'निवडणूक जवळ आली की क्षेपणास्त्रं डागायची, हा भाजपाचा फॉर्म्युला आहे. मात्र तो जनतेनं नाकारला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था यांच्यासारख्या समस्या जनतेला महत्त्वाच्या वाटतात. मात्र भाजपाला त्याबद्दल काहीही वाटत नाही,' अशी टीका आझाद यांनी केली. 

भाजपाला लोकांची चिंता नाही. नोटबंदीमुळे लाखो लोकांचे रोजगार गेले. जीएसटीमुळे सर्वसामान्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. पेट्रोलचे दर वाढत आहेत. सरकारवर रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेण्याची वेळ आली आहे. मात्र याचं भाजपाला काहीच वाटत नाही, असं आझाद म्हणाले. भाजपा सतत इलेक्शन मोडमध्ये असते, असा टोलादेखील त्यांनी लगावला. भाजपा केवळ निवडणुका लढवण्यासाठी सत्तेत आली आहे. ते स्वप्नातही निवडणुका लढवत असतात. मंत्रालयातल्या कामकाजावेळीही भाजपाची नेते मंडळी निवडणुकांसाठी व्यूहनीती आखत असतात, असं आझाद यांनी म्हटलं. 
 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result BJP begging before independent MLAs to form government says Ghulam Nabi Azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.