हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:47 IST2025-12-02T16:46:28+5:302025-12-02T16:47:10+5:30
Maharashtra Local Body Election: कर्मचाऱ्याने केलेली ही चूक गंभीर असून, त्यामुळे एकाच व्यक्तीला पुन्हा मतदान करण्याचा धोका निर्माण झाला असता.

हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
वर्धा: लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान वर्धा येथे एका मतदान केंद्रावर कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे मोठी चूक समोर आली आहे. मतदाराच्या बोटाला न पुसणारी शाई लावायलाच कर्मचारी विसरला आहे.
वर्ध्यात केसरीमल कन्या शाळा, रूम नंबर एक मधील मतदान केंद्रावर ही घटना घडली. विजय उपशाम नावाच्या मतदाराने आपले मत नोंदवले. मात्र, मतदानाची प्रक्रिया पूर्ण करताना मतदान केंद्रावरील संबंधित कर्मचारी दुगप्पांमध्ये इतके गुंग होते की, त्यांनी मतदाराच्या बोटाला शाई लावली नाही.
मतदान झाल्यानंतर जेव्हा हा प्रकार मतदाराच्या लक्षात आला, त्याने बाहेर येत ओळखीच्या लोकांना याची माहिती दिली. कर्मचाऱ्याने केलेली ही चूक गंभीर असून, त्यामुळे एकाच व्यक्तीला पुन्हा मतदान करण्याचा धोका निर्माण झाला असता.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर, तातडीने संबंधित मतदार विजय उपशाम यांना पुन्हा मतदान केंद्रावर नेण्यात आले आणि त्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली. मात्र, मतदानाच्या अत्यंत संवेदनशील प्रक्रियेदरम्यान अशा प्रकारचा निष्काळजीपणा समोर आल्याने निवडणूक आयोगाच्या यंत्रणेतील कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.