भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:44 IST2025-12-02T12:37:29+5:302025-12-02T12:44:23+5:30
Bhagur Municipal Council Election: शिवसेनेच्या एका उमेदवाराचेच नाव मतदार यादीत सापडत नसल्याने मतदारांमध्ये आणि निवडणूक यंत्रणेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
नाशिक जिल्ह्यात आज अकरा नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडत असताना, भगुर नगरपरिषद मतदारसंघात मात्र मतदानावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या एका उमेदवाराचेच नाव मतदार यादीत सापडत नसल्याने मतदारांमध्ये आणि निवडणूक यंत्रणेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
भगुर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उभ्या असलेल्या शांता गायकवाड यांचे नाव मतदारांच्या यादीत कुठेही दिसत नसल्याने हा प्रकार समोर आला. आपलेच नाव नसल्याने खुद्द उमेदवारालाही या गोंधळात अडकावे लागले. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नाशिक जिल्ह्यातील एकूण अकरा नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील ४१६ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडत आहे, ज्यात नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांसह सदस्यांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. यासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी सेवेत असून, संवेदनशील केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यात भगूर, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, येवला, पिंपळगाव, ओझर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी महायुतीमध्येच काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र, भगुरमधील या गोंधळामुळे निवडणुकीच्या वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. आता याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.