Maharashtra Government: राजकीय मतभेद विसरत एकोप्याचे दर्शन, विधानभवन परिसर भारावला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 05:32 AM2019-11-28T05:32:26+5:302019-11-28T05:34:38+5:30

आमदारांच्या शपथविधीच्या निमित्ताने बुधवारी विधानभवन परिसरातील वातावरण भारावलेले होते. नवीन सदस्यांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता.

Maharashtra Election, Maharashtra Government: Forgetting political differences, Darshan of unity | Maharashtra Government: राजकीय मतभेद विसरत एकोप्याचे दर्शन, विधानभवन परिसर भारावला

Maharashtra Government: राजकीय मतभेद विसरत एकोप्याचे दर्शन, विधानभवन परिसर भारावला

googlenewsNext

मुंबई : आमदारांच्या शपथविधीच्या निमित्ताने बुधवारी विधानभवन परिसरातील वातावरण भारावलेले होते. नवीन सदस्यांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता. त्यांचे कौतुक पाहण्यासाठी आलेले नातेवाईकही भारावून गेले होते.
अजित पवारांचे बंड शमण्यासाठी ज्यांची भावनिक साद महत्त्वाची ठरली त्या खा.सुप्रिया सुळे काही वेळ विधानभवनाच्या दारावच उभ्या होत्या आणि सर्वपक्षीय आमदारांचे स्वागत करीत होत्या. जणू काही आपल्या घरचे लग्नकार्य आहे या उत्साहाने त्या येणाऱ्या प्रत्येक आमदाराचे सुहास्यवदनाने स्वागत करीत होत्या. मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही त्यांनी स्वागत केले.

गेले काही दिवस असलेला राजकीय तणाव निवळला होता आणि त्याची जागा एकमेकांशी हस्तांदोलन करीत हास्यविनोदांनी घेतली होती. राजकारणातील कटूता विसरत सगळे एकमेकांना ‘जणू काही घडलेच नाही’ अशा सहजतेने भेटत होते. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही असेच वातावरण होते.

अजित पवार विधानसभेत आले त्यावेळी राष्ट्रवादीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. सुप्रिया यांनी अजित पवार यांना लवून नमस्कार केला. दोघांच्या गळाभेटीने कुटुंबाचे बंध किती घट्ट असतात याचा प्रत्यय आला. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे सपत्नीक आले होते. आदित्य ठाकरे, रोहित पवार, नमिता मुंदडा, आदिती तटकरे या तरुण नेत्यांनी मीडियाचे लक्ष वेधून घेतले.

विधानभवनातील कर्मचारी, अधिकारीही ओळखीच्या, गावाकडच्या आमदारांबरोबर सेल्फी काढत होते. काही आमदारांचे नातेवाइक, समर्थक यांनीही विधानभवनात गर्दी केली होती आणि त्यांचेही आमदारांबरोबर फोटोसेशन सुरू होते. पत्रकार, आमदारांची सत्ताकारणाचा डाव कसा व का उलटला, अजित पवार माघारी का फिरले याची चर्चा सुरू होती.

ईश्वरसाक्ष, गांभीर्यपूर्वक अन् बाळासाहेबांचे स्मरण
 
मुंबई : ईश्वरसाक्ष, गांभीर्यपूर्वक, अल्लासाक्ष अशा विविध पद्धतीने विधानसभेच्या नवीन सदस्यांनी बुधवारी शपथ घेतली. सर्वपक्षीय आमदार एकमेकांना अत्यंत जिव्हाळ्याने भेटताना दिसत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गळाभेट घेतली. दोन दिवस देवेंद्र फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार अशा दोघांनी प्रेमपूर्वक हस्तांदोलन केले.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार वगळता २८७ आमदार यांनी विधानसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांनी हंगामी अध्यक्षांसोबत बबनराव पाचपुते, विजयकुमार गावित आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची ही हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली होती. सगळ्यात आधी या तिघांना शपथ देण्यात आली. त्यानंतर माजी विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील, हरीभाऊ बागडे यांनी शपथ घेतली. मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, अजित पवार यांनी शपथ घेतली.

सकाळी ८ वाजता वंदेमातरमने विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात झाली. पाच मिनिटं आधी सभागृहात मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले तेव्हा त्यांनी समोरील बाकावरील सर्व सदस्यांच्या जवळ जाऊन त्यांचे हस्तांदोलन करीत त्यांची भेट घेतली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सभागृहात थोडेसे उशिरा आले. तेव्हा पहिल्या रांगेत बसलेले धनंजय मुंडे यांनी उठून भुजबळ यांना पहिल्या रांगेतली जागा दिली व स्वत: मागच्या रांगेत बसले. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडून आले असले तरी माजी मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पहिल्या रांगेत आपल्या बाजूला बसवून घेतले.

माजी विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी शपथ घेताना स्वत:चा नामोल्लेख केलेला नव्हता. तेव्हा सभागृहातील सदस्यांनी नाव घ्या... नाव घ्या... असा घोष करताच त्यांनी दुरुस्ती केली.

रोहित पवारांनी केला आईचा उल्लेख
शपथेच्या शेवटी काही सदस्यांनी काही दैवतांची नावे घेतली. त्यात जय श्रीराम, जय जिजाऊ, जय सेवालाल आदी उल्लेख होता. शिवसेनेचे दिलिप लांडे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून शपथ घेतली. रोहित पवार यांनी स्वत:चे नाव घेताना त्यांच्या आईच्या नावाचाही उल्लेख केला.

शपथ विधिसंमतच हवी
राज्य विधिमंडळाच्या निर्वाचित किंवा नियुक्त सदस्याने पदभार स्वीकारण्यापूर्वी राज्यघटनेशी एकनिष्ठ राहण्याची, भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता अभेद्य राखण्याची व पदाच्या कर्तव्यांचे प्रामाणिकपणे निर्वहन करण्याची शपथ घ्यावी लागते.
या शपथेची नेमकी शब्दयोजना काय असावी याचा विधिसंमत नमुना राज्यघटनेच्या परिशिष्ट-३ मध्ये दिलेला आहे. त्यात ही शपथ ईश्वराला स्मरून किंवा गांभीर्यपूर्वक अशा फक्त दोनच प्रकारे घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे ईश्वर सोडून अन्य कोणत्याही वंदनीय व्यक्तिमत्वाच्या नावे घेतलेली शपथ ही विधिसंमत मानली जात नाही.
यापूर्वी दक्ष पीठासीन अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे कोणाही पूज्य मानवाला स्मरून घेतलेली शपथ अग्राह्य ठरविली होती.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Forgetting political differences, Darshan of unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.