Editors' View: महायुती २०० पार जाईल का? काय वाटतं 'लोकमत'च्या राज्यभरातील संपादकांना?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 01:48 PM2019-10-22T13:48:28+5:302019-10-22T13:59:38+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९: काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची महाआघाडी एक्झिट पोलमधील 'पिछाडी' मान्य करायलाच तयार नाही.

Maharashtra Election 2019: What is the prediction of Lokmat Editors after Vidhan Sabha Voting and Exit Polls | Editors' View: महायुती २०० पार जाईल का? काय वाटतं 'लोकमत'च्या राज्यभरातील संपादकांना?

Editors' View: महायुती २०० पार जाईल का? काय वाटतं 'लोकमत'च्या राज्यभरातील संपादकांना?

Next
ठळक मुद्देराज्यभरातील ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आणि ३,२३७ उमेदवार २४ ऑक्टोबरची वाट बघताहेत.महायुतीला एक्झिट पोलनंतर '२०० पार'ची स्वप्नं पडू लागली आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची महाआघाडी एक्झिट पोलमधील 'पिछाडी' मान्य करायलाच तयार नाही.

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी ३,२३७ उमेदवारांचं भवितव्य काल संध्याकाळी सहा वाजता ईव्हीएममध्ये बंदिस्त झालं. आता हे सगळे उमेदवार आणि राज्यभरातील ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार (यापैकी ६० टक्क्यांनीच मतदान केलंय, पण निकालाची उत्सुकता सगळ्यांनाच आहे) २४ ऑक्टोबरची वाट बघत आहेत. त्यांची ही आतुरता एक्झिट पोलच्या आकड्यांनी भलतीच वाढवली आहे. भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीला एक्झिट पोलनंतर '२०० पार'ची स्वप्नं पडू लागली आहेत. कारण चार एक्झिट पोलने त्यांना द्विशतकापुढे नेलंय. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची महाआघाडी एक्झिट पोलमधील 'पिछाडी' मान्य करायलाच तयार नाही. २४ तारखेलाच खरा कौल समोर येईल, असं ते म्हणत आहेत. 

एक्झिट पोलच्या आकड्यांनंतर सोशल मीडियाही ढवळून निघाला आहे. दोन्हीकडचे समर्थक आक्रमकपणे आपली बाजू मांडत आहेत, आपापले अंदाज वर्तवत आहेत. या पार्श्वभूमीवर, 'लोकमत'च्या राज्यभरातील संपादकांची मतं आम्ही जाणून घेतली. महायुती २०० चा आकडा पार करू शकते का, असा प्रश्न आम्ही या संपादक मंडळींना विचारला तेव्हा त्यांनी आपलं म्हणणं साधार मांडलं. चला तर मग पाहू या, अनेक निवडणुका कव्हर केलेल्या आणि यंदाचाही प्रचार बारकाईने पाहिलेल्या संपादकांची मतं...

विधानसभा निवडणुकीचे सर्व 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

महाआघाडीला जास्त जागा कशा द्यायच्या?

विधानसभा निवडणुकीत पहिल्यापासून जोर दिसला, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा. 'मी पुन्हा येईन' असं म्हणूनच ते रणांगणात उतरले आणि त्यांच्या या पवित्र्यापुढे काँग्रेसनं लढाई सुरू होण्याआधीच शस्त्रं टाकल्याचं दिसलं. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात, एकेकाळच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांनी पूर्ण ताकद लावायला हवी होती. पण, राहुल गांधींच्या मोजक्या सभा वगळता राष्ट्रीय स्तरावरचा एकही स्टार प्रचारक महाराष्ट्रात आला नाही. ज्योतिरादित्य शिंदे शेवटी-शेवटी दिसले आणि मल्लिकार्जुन खर्गे प्रभाव पाडू शकले नाही. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक कितपत गांभीर्याने घेतली हा प्रश्नच आहे. शरद पवारांनी प्रचार जोरदार केला. तो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या काळजाला भिडलाही; पण सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, बारामती वगळता त्याचा महाराष्ट्राच्या अन्य भागात मोठा फायदा होईल, असं दिसत नाही. शिवसेना नेमकी कोणती खरी, आधीची की आत्ताची, हेच कळत नसल्यानं मतदारांचा विश्वास जिंकण्यात तेही अपयशी ठरले. हे सगळं भाजपाच्या पथ्यावर पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी ३७० चा मुद्दा मांडल्याची खिल्ली उडवली गेली, पण त्यावरूनच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची कोंडीही केली, हेही नाकारता येणार नाही. त्यामुळे महायुती २०० च्या पुढे जाऊ शकते.

- दिनकर रायकर, सल्लागार संपादक 
....................................... 

...पण मुख्यमंत्र्यांचं 'ते' विधान सूचक?

भाजपा आणि शिवसेनेनं गेल्या वेळची निवडून वेगळी लढवली, तरी त्यांचे १८५ आमदार सध्याच्या विधानसभेत आहेत. केंद्रात भाजपाचं प्रचंड बहुमतातलं सरकार आहे. निवडणुकीचं पूर्ण नियोजन करून भाजपा मैदानात उतरली होती. त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास होता, आक्रमकता होती. निवडणूक जिंकण्यासाठीची व्यूहरचना, धोरणं आणि नीती त्यांनी खूप आधी आखली आणि प्रत्यक्षात राबवली. विरोधी पक्षातील जिंकून येतील अशा अनेक उमेदवारांना त्यांनी विचारपूर्वक पक्षात घेतलं. त्यासाठी निष्ठावंतांची नाराजी पत्करली. पण ठसठशीत बहुमत हाच त्यामागचा हेतू होता. शिवाय, केंद्रातलं सरकार, त्यांनी घेतलेले निर्णय याचाही प्रभाव, परिणाम राज्यातील मतदारांवर होतच असतो. शिवसेनाही नव्या जोमाने प्रचारात उतरल्याचं दिसलं. त्यामुळे राष्ट्रवादाचा मुद्दा, विकासाचा विश्वास आणि भावनिक साद या तीन मुद्द्यांच्या जोरावर महायुती २०० चा आकडा गाठू शकते, असं वाटतं. मात्र त्याचवेळी, मुख्यमंत्र्यांचं एक वाक्य लक्षवेधी ठरतं. दोन-तृतियांश बहुमताच्या (१९२ जागा)किती पुढे जातो हेच पाहायचं, असं देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हटलंय. २००च्या पुढे जाऊ असं त्यांनी ठामपणे म्हटलेलं नाही. हे थोडं अनालकनीय वाटतं. 

- विजय बाविस्कर, समूह संपादक

मध्य प्रदेशचा निकाल विसरता येत नाही!

काँग्रेस-राष्ट्रवादीकडे सक्षम नेतृत्व नसणे आणि सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नसणे, ही युतीची मुख्य जमेची बाजू. याला संघटनेची जोड. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ३७०, तिहेरी तलाक असे लक्ष वेधून घेणारे व विरोधकांना निष्प्रभ करणारे निर्णय आहेत, तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाहीत. अन्य पक्षांच्या गळतीवर ते अधिक अवलंबून आहेत. फडणवीसांचा प्रचार हा नकारात्मक आहे तर मोदींचा सकारात्मक. शिवाय भाजपाची संघटनेची बांधणी महाराष्ट्रात सर्वदूर झालेली नाही. म्हणून त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना पायघड्या अंथरल्या. मात्र फडणवीस हे हुशार, भ्रष्टाचारमुक्त व तरुण मुख्यमंत्री अशी लोकांमध्ये प्रतिमा आहे. ब्राह्मण मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा राहिलेली नाही. हा माणूस कठीण परिस्थिती शांतपणे हाताळू शकतो, व्यवहारकुशल आहे असे अनेकांना वाटते. फडणवीसांच्या या जमेच्या बाजू, मोदींवरील विश्वास व राष्ट्रवादीतील गळती हे भाजपाला १२० ते १३० पर्यंत नेतील. पण संघटनेचा अल्पविस्तार व लक्षवेधी कामगिरीतील अपयश हे १५०च्या आत ठेवील. शिवसेनेला फटका बसेल असेही वाटते. सरकारमध्ये असताना केलेली टीका जनता विसरलेली नाही. शिवसेनेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे व याचाही युतीची फटका बसेल. शरद पवारांचा पक्ष कधीच चार जिल्ह्यांच्या पलिकडे प्रभावशाली नव्हता व राज ठाकरे कधीच माध्यमांपलिकडे प्रभावशाली नाहीत. मात्र राष्ट्रवादी व काँग्रेसचे काही बळकट मतदारसंघ आहेत. तेथे ते टिकून ८०च्या पुढेही जातील. मोदींची लोकप्रियता व राज्य सरकारचा स्वच्छ कारभार मध्य प्रदेशात भाजपाला उपयोगी पडला नव्हता हेही विसरता येत नाही.

- प्रशांत दीक्षित, संपादक, पुणे
................

शेवटच्या दिवसांत चित्र फिरलं!

युती सत्तेत येईल हे निश्चित असले तरी ती २०० पार जाईल असे वाटत नाही. कारण यंदा खरेच वातावरण फिरले आहे, असे वाटत होते. आघाडीमध्ये समर्थ नेतृत्व दिसून आले नाही, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकटेच मोठ्या हिमतीने किल्ला लढताना दिसून आले. पण काँग्रेसकडे तर नेतृत्वाची पूर्णतः वानवा होती. अशाही स्थितीत आघाडीच्या काही जागा यंदा निश्चित वाढतील. कारण, युतीच्या उमेदवारांचा फाजील आत्मविश्वास. अगोदर ज्या पद्धतीने एकतर्फी निवडणुकीचे चित्र वाटत होते तसे शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहू शकले नाही, त्याला युती मधील बेबनाव आणि अन्यही अनेक कारणे आहेत. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता यंदा युती २०० पार जाईल, असे वाटत नाही.

- किरण अग्रवाल, संपादक, नाशिक

अपक्ष वाढणार...परंतु ताटातलं वाटीत!

मतदान झाल्यानंतर 'पोल-खोल'चं पेव भलचंच फुटलंय. प्रत्येकाचे आकडे वेगळे असले तरी भाजपच्या भावी आमदारांची संख्या साऱ्यांसाठीच चर्चेचा विषय बनलीय. केवळ 'मोदी नाम केवलम अन् ३७० इफेक्ट'च्या जोरावर भाजप स्वबळावर सरकार स्थापण्यापर्यंत पोहोचू शकेल, असं जे चित्र निर्माण केलंय, त्यात काही प्रमाणात तथ्य. यावेळी लढण्यासाठी लागणारा जो जोश लागतो, तो काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आढळला नाही, हेही मान्य. एकटे शरद पवार सोडले तर राष्ट्रवादीची खालची फळी मनापासून संघर्ष करत होती का, हाही संशोधनाचाच भाग. मात्र या साऱ्या गदारोळात भाजप-सेना महायुतीतील बंडखोरांची दखल या 'पोल-खोल'वाल्यांनी खूप गांभीर्यानं घेतल्याचं दिसेनासं झालंय.

पश्चिम महाराष्ट्रातील अशा किती तरी जागा आहेत की, जिथं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या प्रस्थापित नेत्यांना पक्षात घेऊन भाजप-सेनेनं मूळच्या इच्छुक कार्यकर्त्यांना बाजूला ठेवलंय. त्यामुळे ज्या तीव्रतेनं बंडखोरी उफाळून आली, त्याचा सर्वाधिक फटका महायुतीलाच बसणार, हेही निश्चित. त्यामुळे यंदा अपक्ष आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता अधिक असली तरी नंतर हीच मंडळी पुन्हा सन्मानानं सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसतील, यातही शंका नसावी. कारण 'ताटातलं वाटीत' पडलं म्हणून पोट भरणाऱ्यांना काही फरक पडत नाही.

- सचिन जवळकोटे, संपादक, सोलापूर

Exit Poll: साताऱ्यात राष्ट्रवादीचा दोन्ही राजांना धक्का?

मुंबई, कोकणात आघाडीला फटका; तर पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादीला तारणार? 
 

युती झाली, पण 'दिसली नाही'!

* महायुती दोनशे जागांपर्यंत पोहोचेल; पण 200 चा आकडा पार करू शकणार नाही असे वाटते.
* विरोधकांना प्रचारादरम्यान फायदा करून घेता आला नसला तरी मतदारांमध्ये अनेक मुद्द्यांवरून रोष होता हे जाणवत होते.
* शरद पवारांनी प्रचारादरम्यान त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थितीत सुधारणा होईल असे वाटते.
* विदर्भात महायुती क्लिन स्विप करेल असे एक्झिट पोलवरून भासत आहे; परंतु प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार अडचणीत आहेत.
* महायुती साकारली असली तरी प्रचारादरम्यान भाजप आणि शिवसेनेनेदरम्यान अजिबात एकसंधपणा दिसून आला नाही.
* भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना मित्र पक्षांमधील बंडखोर उमेदवारांचा फटका बसण्याची दाट शक्यता दिसत आहे. अनेक मतदारसंघांमध्ये मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे काम करण्याऐवजी स्वपक्षाच्या बंडखोर उमेदवारांसाठी पक्षाची संपूर्ण यंत्रणा झटत असल्याचे चित्र दिसले.

- रवी टाले, संपादक, अकोला

Exit Poll: ...तर शिवसेना इतिहास रचणार; पहिल्यांदाच शतक गाठणार

Exit Poll: परळीत मुंडे बहीण-भावांमध्ये कोण मारणार बाजी? असा असेल निकाल!

Exit Poll: महायुती सत्ता राखणार; द्विशतक गाठणार; महाआघाडी पुन्हा सत्तेपासून दूर

महाआघाडीला 'शतक' शक्य

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी किमान १०० जागांपर्यंत जायला हवी. या निवडणुकीत ग्रामीण भागात भाजपविरुद्ध रोष होता. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल आणि त्यांना फोडल्यानं भाजपाबद्दल राग होता. शरद पवार यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती दिसली. त्यामुळे एक्झिट पोल अविश्वसनीय वाटतात. बाळासाहेब थोरात पडणार, असा सर्व्हे येतो तेव्हा मतदारही संभ्रमात सापडतात. थोरात यांच्या मतदारसंघात सेना जिंकेल असे सेनेच्या कार्यकर्त्यांना देखील वाटत नाही. तरीदेखील असा सर्वे येतो याचा अर्थ काय काढायचा? कालच्या सर्व्हेत केवळ काँग्रेसचे नेते पडताना दाखविले जात आहेत. वास्तव हे आहे की महायुतीचे अनेक नेते अडचणीत आहेत. मात्र तसे दाखविले जात नाही. त्यामुळे हे एक्झिट पोल एकांगी वाटतात.

- सुधीर लंके, अहमदनगर आवृत्ती प्रमुख
 

Web Title: Maharashtra Election 2019: What is the prediction of Lokmat Editors after Vidhan Sabha Voting and Exit Polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.