Maharashtra Election 2019 one fraction of congress mla wants to support shiv sena to form government | महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा एक गट देणार शिवसेनेला 'हात'?; भाजपाला दूर ठेवण्याच्या हालचाली जोरात
महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा एक गट देणार शिवसेनेला 'हात'?; भाजपाला दूर ठेवण्याच्या हालचाली जोरात

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 12 दिवस उलटले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. शिवसेना, भाजपामध्ये सुरू असलेला संघर्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीची वाढलेली जवळीक अशा घडामोडी राज्यात घडत आहेत. राष्ट्रवादी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस द्विधा मनस्थितीत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेला सहकार्य करण्याबद्दल फारशा अनुकूल नाहीत. मात्र काँग्रेसचा एक गट शिवसेनेसोबत जाण्यास उत्सुक आहे.

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडून सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव आलाच तर तो मान्य करावा, असं मत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलं आहे. यासोबतच विश्वजीत कदम, अमित देशमुख यांचीदेखील हीच भूमिका असल्याचा दावा पाटील यांनी केला. काँग्रेसमधील तरुण गट शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी अतिशय आग्रही आहे. 

काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना मात्र शिवसेनेला सहकार्य करण्याचा विचार फारसा पटत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेनं सरकार स्थापन करावं आणि काँग्रेसनं त्यास बाहेरुन पाठिंबा द्यावा, या प्रस्तावाबद्दल काँग्रेसचे दिल्लीतील नेते अनुकूल नाहीत. त्याचा राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपला होईल, काँग्रेसला मात्र बळ मिळणार नाही, असं दिल्लीतील नेत्यांचं मत असल्याचं समजतं. उत्तर प्रदेशात याआधी काँग्रेसनं समाजवादी पक्ष आणि मायावतीच्या बसपा या दोन पक्षांना बाहेरुन पाठिंबा दिला होता. त्यावेळी काँग्रेसचा जनाधार कमी झाला आणि हे दोन पक्ष वाढले. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार आल्यास अनेक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीकडे वळतील व काँग्रेस दुबळी होईल. शिवाय, हे सरकार किती काळ टिकेल याचीही खात्री नाही. त्यामुळे काँग्रेसनं सावध भूमिका घ्यावी, असं ज्येष्ठांना वाटतं. 
 

Web Title: Maharashtra Election 2019 one fraction of congress mla wants to support shiv sena to form government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.