महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेस नेत्यांमध्ये मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 08:34 PM2019-11-06T20:34:39+5:302019-11-06T20:36:39+5:30

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पाठिंबा मिळू शकतो अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. परंतु सेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांमध्येच दोन सूर दिसून येत आहेत.

Maharashtra Election 2019: Congress leaders differences over Shiv Sena issue | महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेस नेत्यांमध्ये मतभेद

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेस नेत्यांमध्ये मतभेद

Next
ठळक मुद्देराऊत म्हणतात सेनेशी सोयरीक नकोच : भाजपला सत्तेपासून दूर ठेवा, वडेट्टीवारांचे वक्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पाठिंबा मिळू शकतो अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. परंतु सेनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरुन कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांमध्येच दोन सूर दिसून येत आहेत. कॉंग्रेसचा कुठलाही आमदार शिवसेनेसोबत जाऊ इच्छित नाही असे वक्तव्य प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनी केले आहे. तर कुठल्याही स्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सेनेला सशर्त पाठिंबा देण्यास हरकत नसल्याचे संकेत दिले.
दोन्ही नेत्यांनी नागपुरात बुधवारी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. कॉंग्रेस पक्ष हा विचारधारेला पकडून चालणारा पक्ष आहे व कार्यकर्तेदेखील त्याच दिशेने काम करतात. विचारधारेशी संलग्न राहूनच आमदारांनी निवडणूक जिंकली. यात अनेक तरुण आमदारदेखील निवडून आले. यातील एकाही आमदाराला शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी आहे व जो काही निर्णय होईल तो संयुक्तपणेच होईल, असे प्रतिपादन नितीन राऊत यांनी केले. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासंदर्भात वक्तव्य केले. महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. राज्यात राजकीय तिढा भाजपामुळेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका जी आहे तीच आमची आहे. सेनेला पाठिंबा देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठी ठरवतील. परंतु कोणत्याही परिस्थितीत भाजपच्या हाती सत्ता येता कामा नये हेच आमच्या बहुसंख्य आमदारांची मत स्पष्ट आहे. ते आम्ही पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. शिवसेनेला पाठिंबा हवा असेल तर त्यांनी रालोआतून बाहेर पडावे अशी ‘हायकमांड’ची भूमिका असेल तर ती योग्यच आहे. त्याला काहीच हरकत असण्याचे कारण नाही. एखाद्या वेगळी विचारधारा असलेल्या पक्षासोबत जाण्याअगोदर त्यांची विचारधारा बदलली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

शरद पवारांना मुख्यमंत्री करा
यावेळी वडेट्टीवार यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली. पवारांना मुख्यमंत्री करावे आम्हाला आनंदच आहे. जर दुसरा पर्याय असेल तर त्यांनाच मुख्यमंत्री केले पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

भाजपला रस्त्यावर उतरुन धडा शिकवावा
भाजप-सेना यांची महायुती होती. त्यांना सत्ता स्थापन करण्याइतक्या जागा जनतेने दिल्या. मात्र तरीदेखील ते सत्ता स्थापन करत नसतील तर जनतेने रस्त्यावर उतरुन भाजपला धडा शिकवावा, असेदेखील विजय वडेट्टीवार म्हणाले.

Web Title: Maharashtra Election 2019: Congress leaders differences over Shiv Sena issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.