Maharashtra Election 2019 bjp hits out at shiv sena over cm post shares sanjay rathods video | महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तेव्हा शिवसेनेचे मंत्रीच म्हणत होते, फडणवीसच होणार मुख्यमंत्री
महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तेव्हा शिवसेनेचे मंत्रीच म्हणत होते, फडणवीसच होणार मुख्यमंत्री

मुंबई: मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा, शिवसेनेत निर्माण झालेला दुरावा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपा अध्यक्ष अमित शहांनी मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन दिल्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दावा आहे. तर असा कोणताही शिवसेनेला देण्यात आला नव्हता, यावर भाजपा ठाम आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ अमित शहांनीदेखील याबद्दल पुनरुच्चार केला आहे. यानंतर आता भाजपानं शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राठोड 'पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार' असं म्हणताना दिसत आहेत. भाजपानं त्यांच्या फेसबुक पेजवरुन हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली होती. या यात्रेदरम्यान फडणवीस यांनी अनेक जनसभांना संबोधित केलं. त्या जनसभांमध्ये स्थानिक नेत्यांचीदेखील भाषणं झाली होती. शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांनीदेखील महाजनादेश यात्रेदरम्यान भाषण केलं होतं. त्यात त्यांनी फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक करत पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. 

'मी आज अनेकवेळा मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहतो. एवढं टेन्शन असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कधी चिंता मी पाहिली नाही. शांतपणे प्रशासनावर नियंत्रण ठेवून, हसतमुख राहून ते प्रत्येक समस्येवर मार्ग काढतात आणि म्हणून माझ्या मनामध्ये आणि जनतेच्या मनामध्ये अजिबात शंका नाही की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच होणार', असं राठोड यांनी म्हटलं होतं. राठोड यांचा व्हिडीओ भाजपानं 'एक शिवसैनिक आणि सेनेचे मंत्रीही खात्रीने सांगत होते, देवेंद्र फडणवीस हेच होणार मुख्यमंत्री!' अशा मजकूरासह फेसबुकवर शेअर केला आहे.तत्पूर्वी काल भाजपा अध्यक्ष अमित शहांनी लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेत शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबद्दल कोणताही शब्द देण्यात आला नव्हता, असं स्पष्ट केलं. शहांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल भाष्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या संस्कारांवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं. मुख्यमंत्रिपदाबद्दलचा शब्द दिलाच नाही असं म्हणून देवेंद्र फडणवीस शब्द फिरवत आहेत. मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. खोटं बोलणं मला पटत नाही. बाळासाहेबांचे तसे माझ्यावर संस्कार नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शहांसोबत बंद झालेल्या बैठकीचा संदर्भ दिला होता.  त्यावर बंद दाराआड झालेली चर्चा जाहीर करणं, उघड करणं हे आमच्या पक्षाच्या संस्कारात बसत नाही, असा टोला शहांनी लगावला.  

Web Title: Maharashtra Election 2019 bjp hits out at shiv sena over cm post shares sanjay rathods video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.