"अजित पवार नेटवर्कबाहेर आहेत असा आरोप करणाऱ्यांचा हेतू आणि मेंदू तपासून घेण्याची गरज"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 03:01 PM2021-04-23T15:01:16+5:302021-04-23T15:09:34+5:30

Coronavirus - महाराष्ट्राचा कोरोनाविरुद्धचा लढा कमकुवत करण्याचे पाप टीव्हीवर प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भाजपच्या नेत्यांनी करु नये : अजित पवार

maharashtra deputy cm ajit pawar slams chandrakant patil devednra fadnavis not reachable statement coronavirus | "अजित पवार नेटवर्कबाहेर आहेत असा आरोप करणाऱ्यांचा हेतू आणि मेंदू तपासून घेण्याची गरज"

"अजित पवार नेटवर्कबाहेर आहेत असा आरोप करणाऱ्यांचा हेतू आणि मेंदू तपासून घेण्याची गरज"

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्राचा कोरोनाविरुद्धचा लढा कमकुवत करण्याचे पाप प्रसिद्धीसाठी हपापलेल्या भाजप नेत्यांनी करु नये : अजित पवाररुग्णांना उपचारासाठी सोय करण्याला प्राधान्य, अजित पवारांचं वक्तव्य

अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज आरोप करत आहेत," असं म्हणत उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला.

"भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती. टेलिव्हिजनच्या पडद्यावर चमकण्यासाठी हपापलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी, आरोप करुन राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण करु नये. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्याला कमकुवत करण्याचं पाप करु नये,” असा इशारा अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. 

“दररोज सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष भेटीसाठी मी सर्वांना उपलब्ध असतो. मुख्यमंत्री, मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सर्वांशी दिवसभर संपर्क, संवाद सुरु असतो. भाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेटतात. तेही दिवसभर फोन करतात. मंत्रालयात सोमवार ते गुरुवार सकाळी नऊ वाजता मी हजर असतो. पुण्यात शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी बारामतीत दिवसभर कार्यक्रम सुरु असतात. गेली दीड वर्षे हा कार्यक्रम अखंड सुरु आहे. कायम लोकांच्या सतत संपर्कात राहणारा मी कार्यकर्ता आहे. मंत्रालयात आणि राज्यातील जनतेत मी कायम उपस्थित असताना ‘अजित पवार नेटवर्कबाहेर’चा आरोप करणाऱ्यांचा हेतू व मेंदू तपासून घेण्याची गरज आहे,” असंही पवार म्हणाले. 

रुग्णांना उपचारासाठी सोय करण्याला प्राधान्य

"महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या भीषण संकटाशी लढत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वाढत आहे. रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करणे, हॉस्पिटलचा ऑक्सिजन पुरवठा, रेमेडेसिव्हिर इंजेक्शनची उपलब्धता सुनिश्चित करणे, ही माझी प्राथमिकता आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी, सहकारी मंत्र्यांशी, लोकप्रतिनिधींशी, विभागीय आयुक्तांशी, जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद सुरु आहे. उद्योगक्षेत्राशी चर्चा केली जात आहे. त्यातून राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवणे आणि रुग्णांना उपचारांची सोय उपलब्ध करणे ही आजची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अशा परिस्थितीत भाजपचे नेते खोटे-नाटे आरोप करुन महाराष्ट्राची कोरोनाविरुद्धची लढाई कमकुवत करत आहेत. त्यांची वक्तव्ये ही राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करुन राज्याला अडचणीत आणणारी आहेत. भाजपच्या नेत्यांनी त्यांचा वेळ आणि ताकद केंद्राकडून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी वापरावी, ते महाराष्ट्रातील जनतेसाठी हितावह ठरेल," असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
 

Web Title: maharashtra deputy cm ajit pawar slams chandrakant patil devednra fadnavis not reachable statement coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.