विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
By योगेश पांडे | Updated: December 9, 2025 13:04 IST2025-12-09T13:03:31+5:302025-12-09T13:04:43+5:30
Maharashtra Assembly Winter Session 2025: नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे तसेच सर्व सदस्यांसंदर्भात अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या सूर्यकांत मोरेविरोधात मंगळवारी हक्कभंग मांडण्यात आला. विधानपरिषदेत आ.प्रवीण दरेकर व आ.श्रीकांत भारतीय यांनी हा प्रस्ताव मांडला.

विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
- योगेश पांडे
नागपूर - नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे तसेच सर्व सदस्यांसंदर्भात अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या सूर्यकांत मोरेविरोधात मंगळवारी हक्कभंग मांडण्यात आला. विधानपरिषदेत आ.प्रवीण दरेकर व आ.श्रीकांत भारतीय यांनी हा प्रस्ताव मांडला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान २३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहीत पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेदरम्यान पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेचे एकूण कामकाज, तेथील रचना, सदस्य यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. तसेच सभापतींबाबतदेखील आक्षेपार्ह वक्तव्य करत ते कायदेपंडित आहेत का असा सवाल केला होता. विधानपरिषदेतील कार्पेटचा लाल रंग हा दुष्काळाचे प्रतिक आहे व आमदारांच्या लाल बिल्ल्याला कुणी विचारत नाही असेदेखील मोरेने म्हटले होते. याबाबत आ.दरेकर व आ.भारतीय यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला. विधानपरिषदेला मोठी गौरवशाली परंपरा लाभली आहे. त्या सर्वांचा मोरेने अपमान केला आहे व त्यावर कठोर कारवाई व्हावी. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
हक्कभंग समितीची पुनर्रचना करावी
यावेळी संजय खोडके यांनी यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. मात्र त्यांनी अनेकदा हक्कभंगाची नोटीस स्वीकारली जात नाही व हक्कभंग समितीची पुनर्रचना करण्यात यावी अशी मागणी केली.
‘लाल कार्पेट’ची ताकद दाखविण्याची वेळ
शिवसेनेचे अनिल परब यांनी या प्रस्तावाचे अनुमोदन केले. हा राजकीय भांडणाचा नव्हे तर विधानपरिषदेच्या अस्मितेचा मुद्दा आहे. या सभागृहाची व येथील ‘लाल कार्पेट’ची ताकद काय आहे हे दाखविण्याची वेळ आली आहे असे परब म्हणाले.
वक्तव्याला मूक संमती देणाऱ्या नेत्यांवरदेखील कारवाई व्हावी
संबंधित प्रचारसभेत रोहीत पवार,उद्धवसेनेच्या सुषमा अंधारेदेखील उपस्थित होते. त्यांच्यावरदेखील कारवाईचा विचार व्हावा असे सदस्यांनी म्हटले. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोरेच्या वक्तव्याला मूक संमती देणाऱ्या व हसणाऱ्या मंचावरील नेत्यांवरदेखील कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली.