फुके, टिळेकरांनी पासेस नसताना अभ्यागतांना आणलेच कसे? विधानपरिषद सभापतींसमोर सभागृहात दोघांनाही समज
By योगेश पांडे | Updated: December 9, 2025 12:50 IST2025-12-09T12:49:27+5:302025-12-09T12:50:14+5:30
Maharashtra Assembly Winter Session 2025: हिवाळी अधिवेशनात यंदा कडेकोट सुरक्षाव्यवस्था असून विधीमंडळ परिसरातदेखील मर्यादित पासधारकांनाच प्रवेश दिला जात आहे. मात्र काही आमदारांकडून यासंदर्भातील सूचनांचे उल्लंघन करून पासेस नसलेल्यांना आत आणण्यात आले.

फुके, टिळेकरांनी पासेस नसताना अभ्यागतांना आणलेच कसे? विधानपरिषद सभापतींसमोर सभागृहात दोघांनाही समज
- योगेश पांडे
नागपूर - हिवाळी अधिवेशनात यंदा कडेकोट सुरक्षाव्यवस्था असून विधीमंडळ परिसरातदेखील मर्यादित पासधारकांनाच प्रवेश दिला जात आहे. मात्र काही आमदारांकडून यासंदर्भातील सूचनांचे उल्लंघन करून पासेस नसलेल्यांना आत आणण्यात आले. याची विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून सदस्य परिणय फुके व योगेश टिळेकर यांना याबाबत खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.
अधिवेशनात अनेकदा आमदारांसोबत पक्ष पदाधिकारी किंवा कार्यकर्ते विधीमंडळात परिसरात येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे अनेक सदस्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. याबाबत काही आमदारांनी मागील वर्षी तक्रारी केल्या होत्या व यानंतर दैनंदिन पासेसवर मर्यादा आणण्यात आली होती. यंदा यामुळे विधीमंडळ परिसरात अभ्यागतांची फारशी गर्दी नाही. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषद व विधानसभेच्या ३० आमदारांनी त्यांच्या सोबत पासेस नसलेल्या अभ्यागतांना परिसरात आणले. त्यात विधानपरिषदेतील फुके व टिळेकर यांचा समावेश होता.
तसेच काही मंत्री, माजी विरोधी पक्षनेते व राज्यमंत्र्यांचादेखील समावेश होता. सुरक्षायंत्रणेने याबाबतचा अहवाल विधानपरिषद सभापतींसमोर सादर केला. सभापती प्रा.शिंदे यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. फुके व टिळेकर यांनी यासंदर्भात खबरदारी घ्यावी अशी सूचना त्यांनी केली.