मतपत्रिका इतिहासजमा, मतदान ईव्हीएमवरच होणार; निवडणूक आयोगाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 08:04 PM2019-09-18T20:04:25+5:302019-09-18T20:10:12+5:30

निवडणूक तयारीचा केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा

maharashtra assembly election voting will take place on EVM says Chief Election Commissioner | मतपत्रिका इतिहासजमा, मतदान ईव्हीएमवरच होणार; निवडणूक आयोगाची माहिती

मतपत्रिका इतिहासजमा, मतदान ईव्हीएमवरच होणार; निवडणूक आयोगाची माहिती

Next

मुंबई : अन्य कोणत्याही मशीनप्रमाणे ईव्हीएममध्येसुद्धा तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता नाकारत येत नाही. मात्र, ईव्हीएम हॅक करणे किंवा त्यात छेडछाड करणे अशक्य आहे. मतपत्रिकेवरील मतदान हा इतिहास झाला असून ईव्हीएमद्वारेच मतदान घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी आज केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आयोगाचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोगाने आज दिवसभर सह्याद्री अतिथीगृहात विविध राजकीय पक्ष, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांसह निवडणुकीशी संबंधित विविध यंत्रणांच्या अधिकारी, प्रतिनिधींशी चर्चा केली. 

दिवसभर चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुनिल अरोरा म्हणाले की, काही राजकीय पक्षांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली. मात्र, मतपत्रिका आता इतिहासजमा झाल्या आहेत. मतदान ईव्हीएमद्वारेच होणार असल्याचे आयोगाने संबंधित राजकीय पक्षांना सांगितले आहे. अन्य कोणत्याही मशीनप्रमाणे ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. मात्र ईव्हीएम हॅक करणे अथवा त्याच्याशी छेडछाड निव्वळ अशक्य आहे. वयाबाबतच्या शंकाचे आयोगाने निरसन केले आहे. तांत्रिक बिघाडांचे प्रमाणही अगदीच नगण्य असून तातडीने पर्यायी व्यवस्थाही केली जाते. शिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व्हीव्हीपॅटचाही वापर करण्यात येत असल्याचे अरोरा यांनी स्पष्ट केले.

पहिल्या किंवा त्यावरील मजल्यावरील मतदान केंद्रे तळमजल्यावर असावीत, अशी आग्रही मागणी राजकीय पक्षांनी बैठकीत केली. महाराष्ट्रातील अशा प्रकारची सुमारे ५३०० मतदान केंद्रे तळमजल्यावर आली आहेत. जी काही थोडीफार आहेत, तिथे लिफ्टची सुविधा असल्याचे राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आम्हाला सांगितले आहे. तरीही अशा ठिकाणी लिफ्ट सुस्थितीत ठेवत तसे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांनी स्पष्ट केले.

यावेळी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष टपाल तिकीट आणि पाकिटाचे अनावरण करण्यात आले. कॉफी टेबल पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे लिखित 'निवडणूक प्रक्रियेचे नियम व कायदे' या मराठी पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.   
 

Web Title: maharashtra assembly election voting will take place on EVM says Chief Election Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.