Lok Sabha Election 2019 Balu Dhanorkar won from chandrapur | अशोक चव्हाणांमुळे राज्यातील काँग्रेसची झोळी रिकामी होता-होता राहिली ?
अशोक चव्हाणांमुळे राज्यातील काँग्रेसची झोळी रिकामी होता-होता राहिली ?

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार कामगिरी करताना स्पष्ट बहुमत मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपप्रणीत एनडीएने देशात ३५० हून अधिक जागा जिंकल्या. यामध्ये काँग्रेससह विरोधकांची वाताहत झाली. राज्यातही काँग्रेसला मोठे नुकसान झाले. २०१४ मध्ये दोन जागा जिंकणाऱ्या काँग्रेस पक्षाला यावेळी मात्र एक जागा मिळाली. राज्यात एक जागा आल्यामुळे काँग्रेस भूईसपाट होण्यापासून काही प्रमाणात वाचले. यात देखील अशोक चव्हाणांचाच हात असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसला राज्यातील केवळ चंद्रपूरची जागा मिळवता आली. तर हिंगोली आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड ढळला. राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ होणार अशी चिन्हे असताना चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी मात्र अखेरपर्यंत लढा दिला. तसेच केंद्रीयमंत्री आणि विजयाची हॅटट्रीक करणारे हंसराज अहिर यांना पराभवाची धूळ चारली.

दरम्यान शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले धानोरकर यांना काँग्रेसने डावलले होते. परंतु, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची एक ऑडिया क्लीप त्याचवेळी व्हायरल झाली. त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती. त्याची दखल काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. अखेरीस चंद्रपूरचा उमेदवार बदलून धानोरकर यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली. धानोरकरांनी देखील काँग्रेसचा विश्वास सार्थ ठरतव विजय मिळवला.

२०१४ मध्ये काँग्रेसला नांदेड आणि हिंगोली दोन जागा जिंकता आल्या होत्या. नांदेडमधून खुद्द अशोक चव्हाण होते. तर हिंगोलीतून राजीव सातव विजयी झाले होते.


Web Title: Lok Sabha Election 2019 Balu Dhanorkar won from chandrapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.