मुंबई : मतदार यादीतील गोंधळ, ऐन मतदानाच्या काही तास आधी काही ठिकाणी पुढे ढकललेली निवडणूक या पार्श्वभूमीवर राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी मतदान होत असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात होईल आणि सांयकाळी ५:३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. या निवडणुकांची मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी होणार आहे.
तब्बल आठ ते दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. निमशहरी भागातील मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने मतदान यंत्रात बंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीत एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
नगरपालिका व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी १७ हजार ३६७ कंट्रोल युनिट; तर ३४ हजार ७३४ बॅलेट युनिट वापरली जाणार आहेत.
दुबार नावांसमोर डबल स्टार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे डबल स्टार चिन्ह नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्याच्या नावासमोर ते चिन्ह आहे, त्याने कुठे मतदान करणार आहोत याची माहिती देणे आवश्यक आहे.
अशा मतदाराने एका ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला, तर दुसऱ्या ठिकाणी तशी माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे दोन ठिकाणी त्याला मतदान करता येणार नाही, याची खबरदारी निवडणूक आयोगाने यावेळी घेतली आहे.
निकाल कधी? ३ की २१ डिसेंबरला ? कोर्टाचा आज फैसला
छत्रपती संभाजीनगर : काही नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका रद्द करीत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या सुधारित कार्यक्रमाबाबत दाखल याचिकांवरील सुनावणी सोमवारी येथील खंडपीठात झाली.
त्यावेळी सर्वच ठिकाणांचा निकाल २१ डिसेंबरला लावता येईल का, अशी विचारणा न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेणेगावकर यांनी केली. त्यावर निवडणूक आयोगाचे वकील सचिंद्र शेट्ये यांनी यासंदर्भात मंगळवारी दुपारी १२:३०च्या सुमारास निवेदन करू, असे सांगितले.
राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार निकाल ३ डिसेंबर रोजी घोषित होणार होते. मात्र, जेथे पेच निर्माण झाले तेथे २० डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा व २१ डिसेंबरला निकाल घोषित करण्याचा सुधारित आदेश २९ नोव्हेंबर रोजी काढण्यात आला.
मतदान केंद्रावर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा
मतदान केंद्रावर दिव्यांग, तान्ह्या बाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, आदींना प्राधान्याने मतदान करून दिले जाईल. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरूपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पुरती सुविधा उभारली जाईल. व्हीलचेअरचीही व्यवस्था असेल.
मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. संबंधित ठिकाणी कृष्ठरोग्यांसाठी वेगळे वसतिगृह / आश्रम असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारण्यास हरकत नसेल. तिथे उपलब्धतेनुसार डॉक्टरांची नेमणूक केली आहे. काही ठिकाणी आदर्श मतदान केंद्र उभारली आहेत. सर्व निवडणूक अधिकारी-कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी महिला असतील, त्याला 'पिंक मतदान केंद्र' म्हणून ओळखले जाईल.
एका मतदाराला द्यावे लागणार ३ ते ४ वेळा मत
नगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय १ पद्धती असून, एका प्रभागात सर्वसाधारणपणे दोन जागा आहेत, तर एकूण सदस्य संख्येचा विषम आकडा असलेल्या नगरपालिकेत एका प्रभागात तीन जागा आहेत.
थेट अध्यक्षपदासाठीदेखील २ मतदान होत असल्याने एका मतदाराला तीन ते चार वेळा मत द्यावे लागेल. नगरपंचायतीसाठी दोन मते देणे अपेक्षित आहे.
यादीत असे शोधा नाव
मतदाराला मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in हे संकेत स्थळ विकसित केले आहे. संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल. मतदार यादीतील नावासोबतच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल.
मोबाइलवर बंदी
मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाइल नेण्यास बंदी असेल. मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये; परंतु मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना मोबाइल जमा करण्यासाठी शक्य तिथे कक्ष असेल.
Web Summary : Maharashtra's 264 municipalities and Nagar Panchayats are voting today amidst voter list issues. Polling starts at 7:30 AM and ends at 5:30 PM; results are expected Wednesday. Special facilities available for disabled and senior citizens at polling booths.
Web Summary : महाराष्ट्र के 264 नगरपालिकाओं और नगर पंचायतों के लिए आज मतदाता सूची की समस्याओं के बीच मतदान हो रहा है। मतदान सुबह 7:30 बजे शुरू होकर शाम 5:30 बजे समाप्त होगा; परिणाम बुधवार को अपेक्षित हैं। विकलांगों और वरिष्ठ नागरिकों के लिए मतदान केंद्रों पर विशेष सुविधाएँ उपलब्ध हैं।