राज्यातील २६४ नगरपालिका, नगर पंचायतीसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतदानास सुरुवात झाली. ग्रामीण भागात काही ठिकाणी थंडी असल्याने सकाळी संथगतीने मतदान सुरू होते, तर काही भागात लोकांच्या मतदानासाठी लांबच्या लांब रांगा लावल्याचे चित्र दिसून आले.
सोलापूरातील अकलूज नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. मात्र काही मिनिटांनी इथं ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर १ तास मशिन बंद पडल्याने मतदारांच्या रांगा लागल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी ९.३० पर्यंत सावंतवाडीत १२.१७ टक्के, मालवण १५.१८ टक्के, वेंगुर्ला १०.५१ टक्के तर कणकवलीत १५.८४ टक्के मतदान झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतीत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून एकूण २०० मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. शिंदेसेनेचे उदय सामंत, रामदास कदम, मंत्री योगेश कदम तर माजी आमदार रमेश कदम आणि उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पाणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सांगलीच्या आष्टी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक तीन मधील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशिन नादुरुस्त असल्याने सकाळी सात ते नऊ पर्यंत मतदान ठप्प होते. मात्र २ तासांच्या प्रतिक्षेनंतर ९ वाजल्यापासून मतदान सुरळीत सुरू झाले.
बुलढाण्यात बोगस मतदार पकडले
बुलढाणा नगरपालिका निवडणूकीसाठी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला दीड तास झाले नाही तितक्यात याठिकाणी बोगस मतदार आढळल्याची माहिती समोर आली. प्रभाग क्रमांक १५ साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता.मोताळा येथील एका जणाने उमेदवाराला मतदान केल्यानंतर पकडले आहे. त्याच्यासोबत आणखी एक जण असल्याचं कळले. इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत. घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
शिंदेसेनेच्या आमदाराकडून गोपनीयतेचा भंग
हिंगोली येथील शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी महिला मतदाराला कुठे मतदान करायचे हे सांगितल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मतदान केंद्रावर आमदार संतोष बांगर यांचा वावर दिसून आला. विशेष म्हणजे बांगर यांच्या वर्तवणुकीवर निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कुठलाही आक्षेप घेतला नाही. महिला मतदान करत असताना आमदार बांगर तिथे गेले आणि कुठे मतदान करायचे हे सांगितले. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. चौकशी करून अहवाल आल्यावर गुन्हा दाखल करू असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटलं.
दरम्यान, तब्बल आठ ते दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांची मतदानाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनीही कंबर कसली आहे. निमशहरी भागातील मतदार आपला कौल कुणाच्या बाजूने मतदान यंत्रात बंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नगरपालिका व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी १७ हजार ३६७ कंट्रोल युनिट; तर ३४ हजार ७३४ बॅलेट युनिट वापरली जाणार आहेत.
Web Summary : Maharashtra municipal elections faced disruptions: EVM malfunctions in Akuluj, bogus voters in Buldhana, and long queues elsewhere. Voting proceeded despite delays, with key politicians' reputations at stake across 264 locations. Elections are happening after 8-10 years.
Web Summary : महाराष्ट्र नगरपालिका चुनावों में व्यवधान: अकलुज में ईवीएम खराबी, बुलढाणा में फर्जी मतदाता, और अन्य जगहों पर लंबी कतारें। देरी के बावजूद मतदान जारी रहा, 264 स्थानों पर प्रमुख नेताओं की प्रतिष्ठा दांव पर है। चुनाव 8-10 साल बाद हो रहे हैं।