वेळप्रसंगी कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत करू - विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 06:31 PM2020-10-18T18:31:29+5:302020-10-18T18:32:59+5:30

Vijay Wadettiwar : लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांना मदत करू, असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

Let's take out loans on time, but let's help the farmers - vijay wadettiwar | वेळप्रसंगी कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत करू - विजय वडेट्टीवार

वेळप्रसंगी कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत करू - विजय वडेट्टीवार

googlenewsNext
ठळक मुद्देअतिवृष्टीमुळे कृषी क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने त्यांनी आज नांदेड येथे शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन त्यांनी आढावा घेतला.

नांदेड : अतिवृष्टीमुळे शेती व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे सर्वशक्तीनिशी उभे आहे. शासन स्तरावर पंचनामे पूर्ण झाले असून आता तीन दिवसांपूर्वी पुन्हा अतिवृष्टी झाली. त्याचेही पंचनामे सुरू आहेत. हे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून यासाठी वेळप्रसंगी ड्रोनचाही वापर  करण्यास सांगितले आहे. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांना मदत करू, असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

अतिवृष्टीमुळे कृषी क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने त्यांनी आज नांदेड येथे शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन त्यांनी आढावा घेतला. या बैठकीस आ. अमर राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे वर्षे नैसर्गिक आपत्तीचे वर्षे असेल दुर्देवाने म्हणावे लागत आहे.  कोकणापासून ते विदर्भापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील काही भाग वगळला तर शेतकऱ्यांना खूप काही सहन करावे लागले आहे. कोकणातील चक्रीवादळामुळे सर्वप्रथम तिथे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी राज्य शासनाने सातशे कोटी रुपयांची मदत उभी केली. त्याखालोखाल आताचे हे नुकसान लक्षात घेता आम्ही केंद्र सरकारला मदत करण्याची विनंती केली आहे. त्याबाबत त्यांना लेखीही कळविले आहे. आम्ही आमच्या पातळीवर शेतकऱ्यांसाठी मदतीला तत्पर असून वेळप्रसंगी कर्ज काढायची वेळ जरी आली तरी कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करू असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाचे सर्व मंत्री आज त्या-त्या जिल्ह्यातील शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसमवेत मदतीसाठी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांच्यासमोर ठेवला. शेतीसमवेत नांदेड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात ग्रामीण भागातील रस्ते व लहान पूल वाहून गेल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टिने त्याच्या दुरुस्तीचेही नियोजन आवश्यक असून त्याबाबत स्वतंत्र आर्थिक मदत केली जावी असे आमदार अमर राजूरकर यांनी सांगितले. राज्य शासनाने सर्व शक्तीनिशी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना सहकार्य करण्याची मागणी आमदार मोहन हंबर्डे यांनी केली. जिल्ह्यातील सर्वात जास्त फटका सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून ज्वारी व इतर पिकेही हातची गेले असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

याचबरोबर, दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्री येथील विश्रामगृहात मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी विभाग प्रमुखांना भेटून जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतला. दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी याबाबत पुन्हा बैठक होऊन लोकप्रतिनिधींशी व प्रशासनाशी चर्चा करुन त्यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत उर्वरीत पंचनामे व मदतीसाठी अत्यावश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले.  

Web Title: Let's take out loans on time, but let's help the farmers - vijay wadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.