नमस्कार जितेंद्र आव्हाड,

गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूविरोधात संपूर्ण देश एकजुटीने लढतोय. केंद्र सरकार आणि सगळीच राज्य सरकारं जनतेला या संकटापासून वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आपलं महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि संपूर्ण प्रशासनाच्या कामाचं तर विशेष कौतुक होतंय. विरोधकही या लढ्यात सरकारसोबत आहेत. टीकेऐवजी सूचना करण्यावर त्यांचा भर आहे. एकंदरीत सगळं सुरळीत सुरू असताना, एका घटनेवरून राज्याच्या राजकारणात आरोप, टीका, प्रश्न-प्रतिप्रश्न असा गोंधळ सुरू झाला आहेत. ती घटना म्हणजे, तुमच्या नाथ बंगल्यावर अनंत करमुले या अभियंत्याला झालेली बेदम मारहाण. हा प्रकार पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर, त्यावर तुम्ही मांडलेली बाजू कळल्यानंतर मनात काही प्रश्न निर्माण झालेत. ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच हा पत्रप्रपंच. 

आपण राज्याचे गृहनिर्माण मंत्री, सोलापूरचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते, शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार आहात. यातील प्रत्येक पद हे अत्यंत जबाबदारीचं आहे. मंत्रिपदाची शपथ घेताना तर, राज्यातील नागरिकांच्या संरक्षणाची शपथही आपण घेतली आहे. मग, आपल्यासमोर राज्यातील एका नागरिकाला फायबरची काठी तुटेपर्यंत मारलं जात असताना, आपण ही शपथ विसरला होतात का?

Minister Jitendra Awhad told that this engineer had been posting for the last 3 years against me mac |

आता तुम्ही म्हणताय, हा प्रकार तुमच्यासमोर घडलाच नाही. तुम्हाला सोशल मीडियावरून तो समजला. मात्र, पोलीस तक्रारीतील नोंदीनुसार, तुम्ही तिथेच होतात आणि त्या अभियंत्यानं माफी मागितल्यानंतरही पोलीस त्याला मारतच होते. यातलं खरं कोण, खोटं कोण हे समोर येईलच; पण तुम्हाला हा प्रकार समजल्यावर, मारहाण करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारलात का? साधंसुधं नाही हो, पाठ सुजेपर्यंत मारलंय त्यांनी. मग, मारहाण करणाऱ्यांना पाठीशी घालून तुम्ही या प्रकाराचं समर्थन तर करत नाही ना?    

'मी बराच वेळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं'; मारहाण प्रकरणावर आव्हाडांनी सोडलं मौन

धक्कादायक! जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर झालेल्या मारहाणीत तीन पोलिसांचाही सहभाग

एखाद्या व्यक्तीला, विचारधारेला ट्रोल करणं हा हल्ली दैनंदिन कार्यक्रमच झाला आहे. त्याचं समर्थन अजिबातच करता येणार नाही. कारण, हे ट्रोलिंग एखाद्याचं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त करू शकतं. अनंत करमुले हा अभियंता गेल्या तीन वर्षांपासून तुमच्याविरोधात पोस्ट करतोय, पण त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आलात, असं तुमचं म्हणणं आहे. पण, इथेच तुमची चूक झाली असं तुम्हाला नाही का वाटत? एक तर तुम्ही पहिल्यापासून दुर्लक्ष करायला नको होतं किंवा आत्ताही दुर्लक्षच करायला हवं होतं. आधी दुर्लक्ष केलं आणि मग राग अनावर झाल्यानं बदडलं, या दोन्ही गोष्टी चूकच नाहीत का? 

आपण कुठल्याही घटनेवर, विषयावर भाष्य करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा उल्लेख करता. कायद्याची भाषा बोलता. महात्मा गांधीच्या विचारांचा दाखला देता. नियमाला किंवा कायद्याला धरून न झालेल्या अनेक निर्णयांवर तुम्ही सडकून टीका केली आहे. मग, तुमच्या बंगल्यावर घडलेली मारहाणीची घटना कुठल्या कायद्यात बसते? 

डॉ. दाभोलकर, पानसरे यांची हत्या करणाऱ्यांवर तुम्ही सातत्याने सडकून टीका केली आहे. विचाराचा प्रतिवाद विचारानेच करायला हवा. तो करता येत नाही म्हणून किंवा विचार पटत नाहीत म्हणून एखाद्याची हत्या करणं, हे मान्य होऊच शकत नाही, अशी भूमिका तुम्ही मांडत आला आहात. ती अजिबातच चुकीची नाही. पण, मारहाणीच्या प्रकारामुळे तुमची उक्ती आणि कृती यात तफावत दिसतेय, असं नाही का वाटत?

आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्याला अमानुष मारहाण; भाजपानं थेट सरकारला विचारले चार सवाल

‘ही’ तर अतिशय गंभीर घटना; जितेंद्र आव्हाडांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करा’

काही विशिष्ट लोकांमुळे सोशल मीडिया हा दिवसेंदिवस अत्यंत धोकादायक प्लॅटफॉर्म होत चाललाय. तो दोन गटांत विभागला गेलाय. त्यामुळे अनेक राजकीय नेते, कलाकार, खेळाडू किंवा बड्या व्यक्तींबद्दल या माध्यमावर अगदी पातळी सोडून बोललं जातं. अनेकदा ते शब्द, ती टीका जिव्हारी लागणारी असते. 

तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे, काही ट्रोलर्स अनेक वर्षांपासून तुमच्यावरही अशाच घाणेरड्या भाषेत टीका करत आहेत. मग, त्यांच्याविरोधात तुम्ही पोलिसांत तक्रार का दाखल केली नाहीत? तुमचं राजकीय वर्तुळातील वजन पाहता, तुमच्या तक्रारीवर पोलीस काहीच कार्यवाही करणार नाहीत, असं तर नक्कीच होऊ शकत नाही. बरं, गेले चार महिने तर राज्यात तुमचंच सरकार आहे. गृहमंत्रीही तुमच्याच पक्षाचे आहेत. आपली सायबर क्राइम शाखाही चांगलं काम करतेय. मग, तुम्ही ट्रोलरला कायदेशीर मार्गाने शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न का केले नाहीत? तसं झालं असतं, तर बाकीच्या ट्रोलर्सवरही थोडा धाक बसला नसता का?

'जितेंद्र आव्हाड, तुझा दाभोलकर होणार' धमकी मिळाल्याने खळबळ

जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावरचा 'संविधानवादा'चा बुरखा फाटला; मनसेतील 'दुसरं' मत

जो प्रकार घडला, तो चुकीचाच आहे. त्याचं समर्थन होऊच शकत नाही. तुम्हीही ते न करता, कायदेशीर पावलं टाकावीत असं वाटतं. कारण, हल्ली एखादा ट्रेंड सेट व्हायला अजिबातच वेळ लागत नाही आणि ट्रेंड लोकशाहीला, राज्यघटनेला पटणारा, परवडणारा नाही. 

(ता. क. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना तुम्ही आदर्श मानता. त्यांच्याकडून रागावर नियंत्रण कसं ठेवायचं, टीकेला उत्तर कसं द्यायचं, कुठल्या टीकेकडे दुर्लक्ष करायचं याचा धडा तुम्ही शिकू शकता. त्या गुणांच्या जोरावरच ते आज ‘पवार साहेब’ झालेत, हे तुम्हालाही माहीत आहे!)

आपला,

- अमेय गोगटे

Web Title: Jitendra Awhad Controversy: an open letter to Maharashtra Minister and NCP leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.