चिंताजनक! शेअरबाजार सावरायला तीन ते सहा महिने लागतील : अर्थ अभ्यासकांचे मत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 03:21 PM2020-03-14T15:21:13+5:302020-03-14T15:29:11+5:30

गेले दोन दिवस शेअरबाजारात मोठी पडझड; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण

It will take three to six months for the share market to rise: the opinion of economists | चिंताजनक! शेअरबाजार सावरायला तीन ते सहा महिने लागतील : अर्थ अभ्यासकांचे मत 

चिंताजनक! शेअरबाजार सावरायला तीन ते सहा महिने लागतील : अर्थ अभ्यासकांचे मत 

Next
ठळक मुद्देनिर्देशांकाचा फुगा फुटण्यास कोरोनाचे निमित्त सेन्सेक्स गडगडला सुमारे साडेतीन हजार आणि निफ्टी ९०० अंकांनी

पुणे : मंदीतून अर्थव्यवस्था जात असतानाच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने मंदीत तेल ओतले आहे. सेवा, ऑटोमोबाईल, रसायन या उद्योगांवर थेट परिणाम झाला आहे. आयात आणि निर्यातीलादेखील याचा फटका बसला असून, त्याचे प्रत्यक्ष परिणाम दिसायला दीड-दोन महिने लागतील. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे शेअरबाजार गडगडला आहे. बाजार सावरायला तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे शेअरबाजार अभ्यासकांचे म्हणणे आहे.
गेले दोन दिवस शेअरबाजारात मोठी पडझड होत आहे. सेन्सेक्स सुमारे साडेतीन हजार आणि निफ्टी ९०० अंकांनी गडगडला. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषत:, म्युच्युअल फंड आणि सिस्टिमॅटीक इनव्हेस्टमेंट प्लानमधे (एसआयपी) गुंतवणूक करणारे धास्तावले आहेत. 
या पार्श्वभूमीवर, बोलताना सीए दिलीप सातभाई म्हणाले, की बाजारातील पडझड ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यापूर्वी २००८ सालीदेखील बाजार कोसळला होता. बाजार निर्देशांकाचा वाढलेला फुगा केव्हातरी फुटणारच होता. त्याला कोरोनाचे निमित्त मिळाले. गेले काही महिने देशात मंदीचे वातावरण असूनही बाजाराचा निर्देशांक वाढतच होता. त्यामुळे प्रत्येक वेळी मंदीमुळेच बाजार कोसळतो, असे नाही. सट्टेबाज आणि काही प्रमाणात सरकारदेखील हस्तक्षेप करून बाजाराचा निर्देशांक कमी-अधिक होण्यास हातभार लावत असते. आत्ताची मंदी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण, तसेच महागाई निर्देशांकात वाढ झाल्यामुळे जाणवत आहे. बाजार पूर्ववत होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागेल.
कोरोनामुळे पर्यटन, बिझनेस टूरला फटका बसला आहे. त्यामुळे सेवाक्षेत्राला त्याची थेट झळ पोहोचेल. रशिया-सौदी अरेबियामधील तेलयुद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर ६२ वरून ३५ डॉलर प्रतिबॅरल झाले आहेत. येस बँकेवरील निर्बंधांमुळे पुन्हा एकदा बँकिंग क्षेत्राला हादरा बसला आहे. रसायनांचा कच्चा माल चीनमधून येत असल्याने या उद्योगाला फटका बसला असून, फोर्जिंग उद्योगही प्रभावित झाला आहे. युरोप आणि अमेरिकेतील आयात-निर्यात प्रभावित झाली आहे. त्याचा दृश्य परिणाम दिसण्यास एक ते दीड महिना लागेल. याच्या एकत्रित परिणामामुळे शेअरबाजार प्रभावित झाला आहे. बाजार पूर्वपदावर येण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असे अर्थ अभ्यासक सुहास राजदेरकर यांनी सांगितले. 
बाजार कोसळला असला तरी सिप, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक थांबवू नये; उलट ती वाढवावी. त्याचा पुढे फायदा होईल, असेही राजदेरकर यांनी स्पष्ट केले. 

Web Title: It will take three to six months for the share market to rise: the opinion of economists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.