मुंबईत 27 जानेवारीला येणार चालकविरहित स्वदेशी मेट्रो, स्थानक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 03:48 AM2021-01-20T03:48:58+5:302021-01-20T03:49:38+5:30

बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी भेट दिली. त्यांनी सांगितले की, एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका व स्टेशन्स उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

Indigenous Metro without driver to arrive in Mumbai on January 27 | मुंबईत 27 जानेवारीला येणार चालकविरहित स्वदेशी मेट्रो, स्थानक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

मुंबईत 27 जानेवारीला येणार चालकविरहित स्वदेशी मेट्रो, स्थानक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

googlenewsNext

मुंबई :  मेट्रो २ अ आणि ७ या मार्गांवर चालकविरहित स्वदेशी बनावटीच्या मेट्रो चालविल्या जाणार आहेत. २७ जानेवारीला त्या मुंबईत दाखल होतील. २२ जानेवारी रोजी पहिली मेट्रो बंगळुरू येथून मुंबईच्या दिशेने रवाना हाेईल. मेट्रो चारकोप कारशेडमध्ये दाखल झाल्यानंतर तपासण्या करून पुढील दोन महिन्यांत मेट्रोच्या ट्रायल रन्स सुरू होतील. मे महिन्यापासून प्रवाशांच्या सेवेत त्या दाखल करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड प्रकल्पाला एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी भेट दिली. त्यांनी सांगितले की, एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या मेट्रो मार्गिका व स्टेशन्स उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या निर्मितीचे काम भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडकडे सोपविले आहे. सात वर्षांनंतर मुंबई नवीन मेट्रोच्या स्वागतासाठी सज्ज आहे. मेट्रोचे कोच एसी आहेत. स्वयंचलित दरवाजे आहेत. पॅसेंजर अनाउंसमेंट आणि पॅसेंजर इन्फर्मेशन व्यवस्था कार्यरत आहे. प्रत्येक डब्यात फायर फायटिंग यंत्रणा तसेच सीसीटीव्हीची नजर असेल. प्रवाशांना मदतीसाठी प्रत्येक डब्यात एक स्वीच आहे.

मेट्राेच्या डब्यात सायकल ठेवण्याची व्यवस्था -
मेट्रोच्या प्रत्येक डब्यात दोन सायकली ठेवण्याची व्यवस्था आहे. अपंग बांधवांना व्हीलचेअरसह प्रवास करता यावा यासाठी प्रत्येक डब्यात विशेष साेय उपलब्ध आहे.

अशी असेल नवी मेट्रो
- मेट्राेची कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रतितास.
- स्वयंचलित पद्धतीने धावणार.
- वेग नियंत्रण व सुरक्षेसाठी व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी.
- इंटरनेटच्या वापरासाठी प्रत्येक डब्यात ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क.
- ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य, पर्यायी अपारंपरिक ऊर्जेचा वापर.

एका मेट्राेची प्रवासी क्षमता २२८० - 
- ३७८ कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होतील.
- प्रत्येक ट्रेन ६ कोचची, प्रत्येक कोचमध्ये ५२ प्रवाशांची आणि ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था.
- एका मेट्राेची प्रवासी क्षमता २,२८० तर, डब्यात ३८० जणांचा प्रवास शक्य.
- प्रत्येक कोचसाठी सरासरी ८ कोटी रुपये खर्च. आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोचच्या निर्मितीसाठी येताे सरासरी १० कोटी खर्चत.
- एकूण कोचची संख्या ५७६ पर्यंत वाढणार
- पहिल्या सहा ट्रेन येत्या सहा महिन्यांत दाखल
- त्यानंतर दर महिन्याला तीन याप्रमाणे उर्वरित ट्रेन पुढल्या तीन वर्षांत येणार.

३४० किमी लांबीचे मेट्रो जाळे विस्तारणार -
पाच वर्षांत मंबई महानगर क्षेत्रात जवळपास ३४० किमी लांबीचे मेट्रो जाळे विस्तारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. लोकलला सक्षम पर्याय मिळेल. कोरोनामुळे कामांचा 
वेग मंदावला होता. मात्र, आता ही कामे पुन्हा जोमाने सुरू झाली आहेत.
- एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

Web Title: Indigenous Metro without driver to arrive in Mumbai on January 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.