डहाणू: डेहणे पळे येथील फटाके कारखान्याला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 05:41 PM2021-06-17T17:41:54+5:302021-06-17T17:42:15+5:30

डेहणे पळे येथील एका फटाके बनवणाऱ्या कारखान्यात वेल्डिंगचे काम करत असताना ठिणगी उडून लागलेल्या आगीत कारखाना जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

huge fire broke out in fireworks company near dahanu | डहाणू: डेहणे पळे येथील फटाके कारखान्याला भीषण आग

डहाणू: डेहणे पळे येथील फटाके कारखान्याला भीषण आग

Next

१५ कि.मी. परिसरात स्फोटाची तीव्रता : १० कामगार जखमी

शौकत शेख, लोकमत न्यूज नेटवर्क

डहाणू :डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डेहणे पळे येथील एका फटाके बनवणाऱ्या कारखान्यात वेल्डिंगचे काम करत असताना ठिणगी उडून लागलेल्या आगीत कारखाना जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास घडली. या घटनेत कारखान्यात काम करणारे १० कामगार गंभीर जखमी झाले आहेत, तर २० हून अधिक कामगार किरकोळ जखमी झाले असून त्यांना कुटीर रुग्णालय डहाणू, खासगी दवाखाने तसेच वापी येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

फटाके कारखान्याला आग लागून झालेल्या भीषण स्फोटात आगवण, डेहणे, पळे, आशागड, डहाणू शहर, वाणगाव, देदाळे, साखरे यासह कासा चारोटी परिसरात हादरे बसले असून अनेकांच्या घराचे पत्रे फुटले आहेत. सुरुवातीला हे भूकंपाचे धक्के असावेत, असे नागरिकांना वाटले. मात्र आगडोंब उसळू लागल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. रिलायन्स प्रकल्प, डहाणू नगरपालिका तसेच बोईसरहून अग्निशमक दल पाचारण करण्यात आल्यानंतर तसेच दुपारी दीड वाजता मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर आग आटोक्यात आली. डहाणू पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. या घटनेचे वृत कळताच डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, नगराध्यक्ष भरत राजपूत, तहसीलदार राहुल सारंग, आमदार विनोद निकोले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

डहाणू पोलीस स्टेशन हद्दीत डेहणे गावात नरेश कर्नावट यांच‍ा फटाके निर्मितीचा कारखाना आहे. या कारखान्यात आगवण, डेहणे पळे, वाणगाव परिसरातील १०० हून अधिक कामगार काम करतात. दिवाळीनिमित्त फटाके तयार करण्यासाठी काही दिवसांपूर्वी कंटेनर भरून फटाके तसेच कच्चा माल आणण्यात आला होता. तसेच किरकोळ फटाके बनवण्याचे काम सुरू असताना सोमवारी वेल्डिंगचे काम करताना उडालेली ठिणगी फटाके साठ्यावर उडून लागलेल्या आगीने काही क्षणात भीषण रूप धारण केले. यावेळी कामगारांनी पळापळ केल्याने सर्व जण वाचले. दरम्यान, कंपनीतील कामगार जीवाच्या आकांताने बाहेर पळाले, तर काही जण कारखान्यात अडकल्याने ते गंभीर जखमी झाले. १० कामगारांची स्थिती गंभीर असून त्यांना काॅटेज रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. वेल्डिंग करणारा नवनीत लोटे हाही गंभीर जखमी झाला असून त्यास वापी येथील रेम्बो हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
 

Web Title: huge fire broke out in fireworks company near dahanu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.