मोठा खुलासा! आरोग्य विभागातील भरती घोटाळा; लातुरात व्हायचे डील अन् अंबाजोगाईत घेत होते पैसे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 08:26 AM2021-12-09T08:26:53+5:302021-12-09T08:36:41+5:30

पेपर फुटीप्रकरणी सहसंचालकाला अटक, विशेष म्हणजे बडगिरे व बोटले हे दोघे जिवलग मित्र आहेत, तर दुसरे संशयित डॉ. संदीप जोगदंड, राजेंद्र सानप व श्याम मस्के यांची लोखंडी सावरगाव व भूम ग्रामीण रुग्णालयात ओळख झाली आहे.

Health department recruitment scam; The deal to be done in Latur was taking money from Ambajogai | मोठा खुलासा! आरोग्य विभागातील भरती घोटाळा; लातुरात व्हायचे डील अन् अंबाजोगाईत घेत होते पैसे 

मोठा खुलासा! आरोग्य विभागातील भरती घोटाळा; लातुरात व्हायचे डील अन् अंबाजोगाईत घेत होते पैसे 

googlenewsNext

सोमनाथ खताळ

बीड : आरोग्य विभाग भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रकरणात सहसंचालक (तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान) महेश सत्यवान बोटले (५३) याला सायबर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली आहे. तत्पूर्वी बोटले याच्या मुंबईतील घर व कार्यालयाची सायबर पोलिसांच्या पथकाने झडती घेतली. याच प्रकरणात लातूरच्या उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यालाही मंगळवारी अटक करण्यात आली आहे.  

विशेष म्हणजे बडगिरे व बोटले हे दोघे जिवलग मित्र आहेत, तर दुसरे संशयित डॉ. संदीप जोगदंड, राजेंद्र सानप व श्याम मस्के यांची लोखंडी सावरगाव व भूम ग्रामीण रुग्णालयात ओळख झाली आहे. या सर्वांची साखळी असून प्रत्येक प्रकरणाची डील ही बडगिरे यांच्या कार्यालयात लातूरमध्ये होत होती, तर पैशांची देवाणघेवाण ही अंबाजोगाईत होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आरोग्य विभागातील गट ड पदासाठी ३१ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या परीक्षेचा पेपर फुटला होता. यात मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मंगळवारी प्रशांत बडगिरे याच्यासह 
डॉ. संदीप जोगदंड, शिपाई श्याम मस्के, भूमचा सहायक अधीक्षक राजेंद्र सानप, शिरूरचा शिक्षक उद्धव नागरगोजे यांना अटक झाली आहे.

ऑनलाइन नव्हे, रोख घ्यायचे पैसे
हे सर्व जण ऑनलाइन अथवा धनादेशाद्वारे कधीच पैसे घेत नव्हते. रोख असेल तरच या अन्यथा आपले काम प्रलंबित ठेवले जाईल, असा इशारा ते देत होते. डॉ. जोगदंड हे डॉक्टरांची तर सानप हे कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी एजंटची भूमिका बजावत होते, तर श्याम मस्के हा शिपाई केवळ वसुलीचे काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सर्वांनीच केली बीडमध्ये नोकरी
प्रशांत बडगिरे याने दहा वर्षांपूर्वी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेले आहे. तेव्हाच महेश बोटले लातूर उपसंचालक कार्यालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी होता. डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या बदल्यात दोघांची मैत्री झाली होती. बडगिरे हा अंबाजोगाईचा रहिवासी आहे. राजेंद्र सानप यानेही आष्टी, नेकनूरमध्ये नोकरी केली होती. डॉ. संदीप जोगदंड लोखंडीमध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असून श्याम मस्के हा शिपाई  बडगिरेच्या आशीर्वादाने लोखंडीच्या स्त्री रुग्णालयात कार्यरत आहे.

संचालनालयातूनच फुटला पेपर
पेपर सेट कमिटीवर महेश बोटले सदस्य होता. पेपर सेट करून ज्या संगणकावर ठेवला होता, त्या संगणकाचा ॲक्सेस त्याच्याकडे होता. त्याने या संगणकातून तो पेपर त्याच्या दालनातील संगणकावर काॅपी केला होता. तेथून त्याने स्वत:च्या फायद्यासाठी परीक्षेपूर्वी वितरित केला.

बडगिरे याला मिळाले ३३ लाख रुपये 
बडगिरे याने आपल्याला १५ लाख मिळाल्याचे अगोदर सांगितले होते. पण आता त्याने ३३ लाख मिळाल्याची कबुली दिली आहे. त्याने ज्यांच्याकडून पैसे घेऊन पेपर पुरविला त्यांनी यातून ८० लाख रुपये उकळल्याची माहिती आता समोर आली आहे.  

Read in English

Web Title: Health department recruitment scam; The deal to be done in Latur was taking money from Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.