सरकार तुमच्यासोबत, आंदोलन टाळा; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 04:36 AM2020-09-14T04:36:27+5:302020-09-14T05:58:35+5:30

राज्य सरकार मराठा समाजासोबत असून सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करुन दिलासादायक मार्ग काढण्यात येईल, असे सांगतानाच मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Government with you, avoid agitation; CM appeals to Maratha community! | सरकार तुमच्यासोबत, आंदोलन टाळा; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन!

सरकार तुमच्यासोबत, आंदोलन टाळा; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन!

Next

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय आहे. या निकालाबाबत मराठा समाजाच्या ज्या भावना त्याच राज्य सरकारच्या देखील आहेत. मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही. आक्रमकपणे आणि चिवटपणे ही कायदेशीर लढाई लढली जाईल. सरकार तुमच्यासोबत आहे, त्यामुळे कोरोनाच्या संकटात रस्त्यावर उतरत आंदोलन, मोर्चे काढू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला भावनिक साद घातली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी समाज माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना कोरोना, मराठा आरक्षण व इतर विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, न्यायालयायात युक्तिवाद करताना सरकार अजिबात कमी पडले नाही. आधीच्या सरकारने जे वकील दिले होते तेच कायम ठेवले होते. त्यात आणखी वकीलांची भर घातली होती. इतर राज्यांप्रमाणे मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या बेंचसमोर व्हावी अशी मागणी राज्याने केली होती. ही मागणी मान्य करताना न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस अंतरीम स्थगिती दिली.

इतर राज्यांच्या बाबतीत अशा प्रकारे स्थगिती दिलेली नाही. अशी स्थगिती देण्याची आवश्यकता नव्हती. न्यायालयाच्या या निकालावर काय करता येईल यासाठी राज्य शासन विचार करीत असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणे झाले आहे. त्यांनी देखील यात कुठलेही राजकारण न आणता सरकारच्या बरोबर असून सहकार्य करू,असे सांगितले आहे. राज्य सरकार मराठा समाजासोबत असून सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करुन दिलासादायक मार्ग काढण्यात येईल, असे सांगतानाच मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

जीम-रेस्टॉरंट सुरू करणार पण...
सध्या कोरोना वाढतोच आहे. लस कधी येईल माहिती नाही. पुढची दोन महिने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. राज्यातील जीम-रेस्टॉरंट सुरू करण्याची मागणी होत आहे. काही निर्बंधासह ती येत्या काळात सुरू होतील. परंतु नियमाचे काटेकोर पालन झालेच पाहिजे.
पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका. लोक मास्क घालत नाहीत. इतर देशांनी कायदे कडक केले आहेत. कायद्याने सर्व काही करण्याची गरज आहे का? स्वत:हून आपल्या व इतरांच्या आरोग्यासाठी आपण
वागू शकत नाही का? काही ठिकाणी मात्र कायदे करावे लागणार, अंगवळणी पडेपर्यंत समजावून घ्यावे लागेल. शिथिलता कामाची नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्टÑाला बदनाम करण्याचा डाव
कोरोनाच्या संकटकाळात काही जणांनी पुन:श्च राजकारण सुरु केले आहे. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही, की माझ्याकडे काही उत्तर नाही. पण महाराष्ट्राच्या बदनामीचा जो काही डाव टाकला जात आहेत, राजकारण केले जात आहे त्यावर मी कधीतरी मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून नक्की बोलेल, असा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

तुम्ही जिथे गेला नाहीत, त्या दुर्गम भागात पोहोचलो
मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडत नाहीत, या विरोधकांच्या आरोपाचा त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, तुम्ही जिथे गेला नाहीत अशा दुर्गम भागात मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचलो आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली असली तरी विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि भरती प्रक्रियेवर परिणाम होणार नाही, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून त्यातून मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत दिली. तर १५ सप्टेंबर रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन सरकारची भूमिका व पुढील रणनिती निश्चित केली जाईल, अशी माहिती आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी दिली. बैठकीला विविध संघटनांचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सदस्य, विरोधी पक्षांचे नेते, ज्येष्ठ विधिज्ञ व अधिकारी उपस्थित होते.

Read in English

Web Title: Government with you, avoid agitation; CM appeals to Maratha community!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.