आर्थिक अपयश झाकण्यासाठी सरकारी हिंसाचार - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:45 AM2020-01-10T04:45:44+5:302020-01-10T04:45:55+5:30

आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात हिंसा पसरवीत आहेत.

Government violence to cover financial failure - Ambedkar | आर्थिक अपयश झाकण्यासाठी सरकारी हिंसाचार - आंबेडकर

आर्थिक अपयश झाकण्यासाठी सरकारी हिंसाचार - आंबेडकर

googlenewsNext

मुंबई : आर्थिक आघाडीवरील अपयश झाकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप देशात हिंसा पसरवीत आहेत. मंदीचा परिणाम सर्व क्षेत्रात होणार आहे. देश अत्यवस्थ अवस्थेत असून कोणत्याही क्षणी कोमात जाऊ शकतो. त्यावर उपाय करण्याऐवजी सरकार विद्यापीठातील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात गर्क आहे. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातील हिंसाचार या कटाचाच भाग होता, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी केला.
आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली. दारुडा जसा घरातल्या वस्तू विकून गुजराण करतो, तसेच मोदी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील एक एक कंपनी विकून कारभार हाकत आहे. सरकार मुद्दाम जुनी मनुस्मृतीची व्यवस्था आणण्याच्या हेतूने सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या दुबळे बनविण्याचा प्रयत्न करत आहे. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ घालणे अवघड काम असते. त्यात आजवर केंद्र सरकारने उचललेली पावले ही
देशाला कर्जाच्या सापळ्यात अडकवणारी आहेत. सप्टेंबर २०१९अखेर देशावरील कर्ज ५५७.५ कोटी अमेरिकन डॉलर्स एवढे वाढले होते. कर्जाचे हे ओझे चिंताजनक आहे. आर्थिक संकटाशी सामना करण्याचा उपाय या सरकारकडे नाही, हेच या परिस्थितीतून स्पष्ट झाले आहे. सर्व अपयश उघड होऊ नये म्हणून देशात सरकारला यादवी घडवायची आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.
>शहरी नक्षलवादी संज्ञा भाजपने जन्माला घातली
देशात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्याला झुगारून उभे राहण्याची वेळ आली आहे. संघ आणि भाजपच्या तत्त्वातच हिंसा आहे. याच मार्गाने या संघटना वाढल्या. शहरी नक्षलवादी संज्ञा संघ-भाजपने जन्माला घातली असून, संघच देशातील सर्वात मोठा आतंकवादी आहे, असेही आंबेडकर म्हणाले. अकोला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचाच असेल असा दावा करतानाच वाशिममध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांना पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

Web Title: Government violence to cover financial failure - Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.