राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 02:11 PM2019-07-13T14:11:41+5:302019-07-13T14:13:58+5:30

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे कौतुकही झाले होते.

Fadnavis 'everything' in the state! There is no claim from the BJP leadres for the post of Chief Minister | राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही

राज्यात 'सब कुछ' फडणवीस ! मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमधून दावाच नाही

googlenewsNext

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यानंतर राज्यभर दौरा करण्याची योजना असून बुथ पातळीपर्यंतच जाळं आणखी मजबूत करण्यास भाजपने सुरुवात केली आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होते. २०१९ मध्ये देखील मोदींच्या अवतीभवतीच निवडणूक पार पडली. याचा भाजपला फायदाच झाला. महाराष्ट्रातही यापेक्षा काही वेगळं चित्र नाही. आगामी विधानसभा निवडणूक देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभवतीच फिरणार असं दिसत आहे.

मागील पाच वर्षांत फडणवीस यांच्या मुत्सदी राजकारणामुळे भाजपमधून मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी सांगणारा एकही नेता समोर आलेला नाही. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षातून बेदखल झाले आहे. त्यामुळे राज्यात फडणवीसच भाजपचा चेहरा असतील, अशी शक्यता आहे.

२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेनंतर राज्यात झालेल्या निवडणुकीत सत्तांतर झाले. मात्र त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठीच्या इच्छूकांची यादी भली मोठी होती. निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठतेच्या मुद्दावर एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार तर महिला चेहरा पंकजा मुंडे यांची नावे चर्चेत होती. किंबहुना पंकजा मुंडे, खडसे यांनी तर आपली महत्त्वाकांक्षा अनेकदा बोलून दाखवली होती. परंतु, मुख्यमंत्रीपदाची माळ तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडली. नागपूरचे असल्यामुळे आणि संघाचं असलेला पाठबळ फडणवीस यांच्या पारड्यात पडल्याने हे शक्य झालं होतं.

सत्तेच्या ५ वर्षांच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपच जाळं मोठ्या प्रमाणात वाढला. एवढच काय तर त्यांनी मित्रपक्ष शिवसेनेला देखील जेरीस आणलं. मोठा भाऊ म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेला या विधानसभा निवडणुकीत बरोबरीत आणण्याची किमया फडणवीस यांनी करून दाखवली. अर्थात त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळवून दिले. यात त्यांना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची साथही लाभली.

दरम्यानच्या काळात भाजपच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यापैकी अनेकांना क्लीनचीट दिली. मात्र मुख्यमंत्रीपदासाठी वेळोवेळी दावा ठोकणाऱ्या खडसेंचा बचाव करण्यात फडणवीस अपयशी ठरले. तर पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे देखील कोणत्या ना कोणत्या वादात अडकले. पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे आरोप झाले. तर तावडे यांच्या बनावट डिग्री प्रकरणामुळे वाद निर्माण झाला होता. ही प्रकरण मिटल्यानंतर या नेत्यांकडून कधीही मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे सहाजिकच फडणवीस यांचे मैदान मोकळे झाले.

फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा मोर्चे आणि शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला होता. या दोन्ही आंदोलनांना त्यांनी मुत्सद्दी पणाने हाताळले होते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुकही झाले होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्रीपदासाठी गिरीश महाजन आणि चंद्रकात पाटील यांच्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, या चर्चांना सबळ पाठबळ मिळालेच नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी सबकुछ फडणवीस असंच समिकरण ठरलं आहे.

Web Title: Fadnavis 'everything' in the state! There is no claim from the BJP leadres for the post of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.