शिंदे गटाची युवासेना कार्यकारणी जाहीर; आमदार, मंत्र्यांच्या मुलांचीच वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 08:00 AM2022-10-01T08:00:22+5:302022-10-01T08:01:04+5:30

युवासेनेच्या या कार्यकारणीत घराणेशाही नाही तर कुठली शाही आहे अशा शब्दात शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

Eknath Shinde group Yuvasena executive announced; Children of MLAs and Ministers got opportunity | शिंदे गटाची युवासेना कार्यकारणी जाहीर; आमदार, मंत्र्यांच्या मुलांचीच वर्णी

शिंदे गटाची युवासेना कार्यकारणी जाहीर; आमदार, मंत्र्यांच्या मुलांचीच वर्णी

googlenewsNext

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून युवासेनेची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत बहुतांश आमदार, मंत्र्यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. मंत्री दादा भुसे, अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे यांच्या मुलांचा युवासेनेत समावेश करून घेण्यात आला आहे. आदित्य ठाकरेंसोबत युवासेनेत कार्यरत असणाऱ्या काहींना युवासेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. 

कुणाला मिळाली युवासेनेच्या कार्यकारणीत संधी?
उत्तर महाराष्ट्र - अविष्कार भुसे
मराठवाडा - अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे पाटील
कोकण - विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे
पश्चिम महाराष्ट्र - किरण साळी, सचिन बांगर
कल्याण भिवंडी - दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक
ठाणे, नवी मुंबई, पालघर - नितीन लांडगे, राहुल लोंढे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले
मुंबई - समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे
विदर्भ - ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील

युवासेनेची ही नवी कार्यकारणी शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी जाहीर केली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणारे अनेक तरूण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेत. विविध विभागातील तरूण युवासेनेत काम करतील असं पावसकर यांनी म्हटलं. 

शिवसेनेने केली टीका
युवासेनेच्या या कार्यकारणीत घराणेशाही नाही तर कुठली शाही आहे. ज्याच्या घरात राजकीय वारसा आहे मग ठाकरेंची घराणेशाही कशी होऊ शकते? किरण पावसकर हे संधी शोधत होते पुन्हा उदयास यायची. पावसकरांची कार्यपद्धती सगळ्यांनी पाहिलंय. कार्यकारणीत काय नाविण्य दिले. चांगले कार्यकर्ते का मिळाले नाहीत. ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप करण्याचा तुम्हाला अधिकार काय? असं सांगत शिवसेना प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. 

खरी शिवसेना कुणाची?
उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांच्या भूमिकेला समर्थन देत शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदारांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला. याबाबत शिंदे गटाकडून थेट निवडणूक आयोगाकडे शिवसेना आमचीच असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीशांनी केंद्रीय निवडणूक आयोगच यावर निर्णय देईल असं म्हटलं. त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे भवितव्य आहे. 
 

Web Title: Eknath Shinde group Yuvasena executive announced; Children of MLAs and Ministers got opportunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.