‘ॲमवे’ला ईडीचा दणका; देशव्यापी कारवाईत ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 06:11 AM2022-04-19T06:11:50+5:302022-04-19T06:14:18+5:30

४११.८३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, तसेच ३६ बँक खात्यांतील ३४५.९४ कोटी रुपये जप्त  करण्यात आले.

ED's action on Amve Assets worth Rs 757 crore seized in nationwide operation | ‘ॲमवे’ला ईडीचा दणका; देशव्यापी कारवाईत ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

‘ॲमवे’ला ईडीचा दणका; देशव्यापी कारवाईत ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

googlenewsNext

मनोज गडनीस -

मुंबई : ‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’चे व्यवहार केल्याचा ठपका ठेवत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘ॲमवे’ कंपनीला जोरदार दणका दिला. देशव्यापी कारवाई करीत ईडीने मुंबईतील बँक व्यवहारासह एकूण ७५७ कोटी ७७ लाख रुपयांची कंपनीची मालमत्ता जप्त केली आहे. ४११.८३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, तसेच ३६ बँक खात्यांतील ३४५.९४ कोटी रुपये जप्त  करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरॅमिड रचनेद्वारे देशभरात तब्बल साडेपाच लाख वितरक-एजंटांच्या माध्यमातून उत्पादनांची थेट विक्री करण्याच्या नावाखाली बंदी असलेल्या ‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’चे व्यवहार ‘ॲमवे’ने केल्याचे आढळले आहे. ग्राहकाला उत्पादनांची थेट विक्री केल्यास मिळणाऱ्या घसघशीत कमिशनवर श्रीमंत होण्याचे आमिष दाखवले जात होते. परिणामी, कंपनीचे सदस्य उत्पादनांची विक्री करतानाच नवे सदस्य जोडत अधिक कमिशन प्राप्त करण्यासाठी काम करत राहतात. सदस्यांना द्याव्या लागणाऱ्या कमिशनमुळे बाजारातील स्पर्धक उत्पादनांपेक्षा कंपनीच्या किमती जास्त असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

असे चालायचे व्यवहार
कंपनीने साकारलेल्या पिरॅमिड रचेनत सर्वात वर असलेल्या व्यक्तीस अधिक, तर खालच्या व्यक्तीस कमी पैसे मिळतात. मात्र, हे पिरॅमिड कोसळल्यास सर्वांनाच फटका बसतो. बहुतांशवेळा खाली सर्वसामान्य लोक असतात. अशा लोकांना त्याचा मोठा फटका बसतो. केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण (थेट विक्री) २०२१ नियमांतर्गत अशा विक्रीवर बंदी घातली आहे. 

मनी लाँड्रिंग अंतर्गतही तपास
कंपनीने २००२-०३ ते २०२१-२२ या वीस वर्षांच्या कालावधित एकूण २७ हजार ५६२ कोटी रुपये व्यवसायातून मिळविले आणि यापैकी ७,५८८ कोटी रुपये कमिशनपोटी वितरक तसेच भारत, अमेरिकेतील एजंटांना दिले. याप्रकरणी मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गतही तपास सुरू आहे. 

असे चालते कंपनीचे काम...
- कंपनीतर्फे शानदार हॉटेलमध्ये लोकांना बोलावले जाते. कंपनीचे वितरक, एजंट कंपनीच्या उत्पादनांची विक्री करून आपण कसे श्रीमंत झालो, याच्या कथा लोकांना सांगतात. 
- उत्पादने विकून कसे श्रीमंत होता येते, याचे स्वप्नदायी चित्र दाखवले जाते. सर्वप्रथम कंपनीची महागडी उत्पादने खरेदी करत वितरक व्हावे लागते. त्यानंतर उत्पादनांची विक्री करता येते. यालाच पिरॅमिड पद्धतीचे ‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’ म्हणतात. 

प्रशिक्षक कंपन्याही रडारवर
२०११ पासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती. तेव्हापासून कंपनीने तपास यंत्रणांना सहकार्य करत, हवी ती सर्व माहिती दिल्याचे ‘ॲमवे’ने निवेदनाद्वारे सांगितले आहे. वितरक व एजंटांना प्रशिक्षण देण्याचे काम करणाऱ्या ब्रीट वर्ल्डवाईड इंडिया प्रा. लि. आणि नेटवर्क ट्वेन्टी वन या कंपन्याही आता ईडीच्या रडारवर आल्या आहेत.

१९९८ पासून कारभार
‘अमेरिकन वे’ या शब्दावरून ‘ॲमवे’ असे कंपनीचे नाव पडले. अमेरिकेत सन १९५९ मध्ये स्थापन झालेली ॲमवे कंपनी भारतात १९९५ साली सुरू झाली. पण, प्रत्यक्ष व्यवहार १९९८ पासून सुरू झाले.

काय जप्त?
तामिळनाडूमधील दिंडीगूल जिल्ह्यातील फॅक्टरी, जमीन, मशिनरी, वाहने, मुदत ठेवी, बँक खात्यातील पैसे आदींचा जप्तीमध्ये समावेश आहे. 
 

Web Title: ED's action on Amve Assets worth Rs 757 crore seized in nationwide operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.