Due to 'Lokmat', the magnitude of the floods has reached Delhi: Vijay Darda | ‘लोकमत’मुळेच महापुराची तीव्रता दिल्लीपर्यंत पोहोचली :विजय दर्डा
‘लोकमत’मुळेच महापुराची तीव्रता दिल्लीपर्यंत पोहोचली :विजय दर्डा

ठळक मुद्दे ‘लोकमत’मुळेच महापुराची तीव्रता दिल्लीपर्यंत पोहोचली :विजय दर्डा‘लोकमत’ परिवारातील सदस्यांचे कौतुक

कोल्हापूर : महापुराच्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबीयांची, घराची पर्वा न करता, दक्षिण महाराष्ट्रातील ‘लोकमत’ परिवारातील प्रत्येक सदस्याने जिद्दीने काम केले.


‘लोकमत’द्वारे महाराष्ट्र, गोवा, दिल्लीपर्यंत कोल्हापूर, सांगलीतील महापुराच्या भीषण परिस्थितीची अचूक माहिती राज्यकर्ते आणि शासनापर्यंत सर्वांत आधी पोहोचविली. त्यामुळे पूरग्रस्तांना मोठी मदत झाली. या कामगिरीने ‘लोकमत’ची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढला आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’च्या एडिटोरिएल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी गुरुवारी येथे केले.

महापुरातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या ‘लोकमत’ परिवारातील सदस्यांच्या कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. शिरोली औद्योगिक वसाहतीतील‘लोकमत भवन’मधील या कार्यक्रमास ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, प्रेसिडेंट (अ‍ॅड, सेल्स) करुण गेरा, उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारे, सहाय्यक उपाध्यक्ष (एचआर) बालाजी मुळे, साउथ महाराष्ट्र हेड (अ‍ॅडव्हर्टाइज) आलोक श्रीवास्तव, सोलापूरचे निवासी संपादक सचिन जवळकोटे, सहाय्यक सरव्यवस्थापक रमेश तावडे प्रमुख उपस्थित होते.

विजय दर्डा म्हणाले, ‘लोकमत’ परिवारातील सर्व सदस्य एक ध्यास घेऊन कार्यरत आहेत. त्यांनी महापुरात उल्लेखनीय काम केले. मुख्यमंत्र्यांनीही सांगितले की, ‘लोकमत’मुळे मला महापुराची अचूक माहिती मिळाली. दिल्लीतील नैसर्गिक आपत्ती विभाग, तेथील अधिकाऱ्यांपर्यंत या महापुराची माहिती शासकीय यंत्रणेपूर्वी आणि अचूक, छायाचित्रांसह पोहोचविण्याचे काम ‘लोकमत’ने केले. बचाव, मदतकार्यासाठी त्याची मोठी मदत झाली आणि त्याचे सर्व श्रेय ‘लोकमत’ परिवारातील या सदस्यांचे आहे.

एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले, ‘महापुराच्या काळातील सर्व संकटांवर मात करून ‘लोकमत’च्या संपादकीय, आयसीडी, इलेक्ट्रॉनिक्स, निर्मिती, वितरण, आदी विभागांनी महापुराची तीव्रता राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचविली. आॅनलाईनद्वारे ती जगभरात मांडली. तंत्रज्ञानाचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने केला. प्रतिकूलतेवर मात करून ‘लोकमत’ परिवाराने केलेले काम उल्लेखनीय असून त्याला माझा सलाम आहे. आपल्या परिवारातील या सदस्यांचे कौतुक करण्यासह त्यांच्याबद्दल कृतज्ञता या सोहळ्याद्वारे आम्ही व्यक्त करीत आहोत.

समूह संपादक विजय बाविस्कर म्हणाले,‘कोल्हापूर आवृत्तीने महापुराच्या काळात केलेले काम कौतुकास्पद आहे.’

या कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाला. त्यानंतर महापुरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ‘लोकमत’च्या कोल्हापूर युनिटमधील (कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) संपादकीय, आयसीडी, वितरण, निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, मनुष्यबळ व विकास या विभागाचे प्रमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांचे गुणवंत पाल्य स्मित पाटील, ऋतुजा देशमुख, देवयानी जोशी, यांचा सत्कार झाला. ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी स्वागत केले. संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविकात ‘लोकमत’च्या वाटचालीची माहिती दिली. वरिष्ठ बातमीदार समीर देशपांडे आणि सखी मंच संयोजिका वृषाली शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

’कंटेट इच किंग’

आपण सर्व सदस्य कामात परिपूर्ण, अचूक आणि श्रेष्ठ आहात. आपल्यातील जिद्द कधीही मरू देऊ नका. सध्याचा काळ तीव्र स्पर्धेचा आहे. त्यामध्ये टिकायचे असेल तर ‘कंटेट इज किंग’ हे धोरण ठेवून काम करा, असे आवाहन विजय दर्डा यांनी केले.

‘लोकमत’ला चांगले यश

दक्षिण महाराष्ट्रात ‘लोकमत’ला चांगले यश मिळाले. कोल्हापूर आवृत्तीत सुरू असणारी विविध सदरे, मालिका खूप चांगल्या आहेत. त्यातील हिंदकेसरी दीनानाथसिंह यांचा जीवनपट उलगडणाºया ‘लाल मातीतील हिंदकेसरी’ या मालिकेचा विशेष उल्लेख करावा लागेल. ‘ग्लोबल कोल्हापूरकर’सारख्या वेगळ्या विषयावर वर्धापनदिनाचे विशेषांक काढण्याचे वेगळेपण या आवृत्तीने जपले असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.

कोल्हापूरकर मेहनती, कर्तृत्ववान

कोल्हापूरकर हे कल्पक, मेहनती, कर्तृत्ववान आणि दिलदार आहेत. कोल्हापूर, सांगलीत महापुराच्या काळात प्रशासन, लष्कर, ‘एनडीआरएफ’ आपल्या पद्धतीने मदतकार्य करीत होते. मात्र, त्यावेळी कोल्हापूरकरांनी पूरग्रस्तांना केलेली मदत कुणी विसरू शकणार नाही. त्याबद्दल मी कोल्हापूरकरांना सलाम करतो, असे राजेंद्र दर्डा यांनी यावेळी सांगितले.

‘लोकमत’च्या ताकदीमुळे पूरग्रस्तांना मोठी मदत

या कार्यक्रमात संपादक वसंत भोसले यांनी प्रास्ताविकात ‘लोकमत कोल्हापूर’च्या वाटचालीचा आणि महापुरात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. महापुराच्या संकटाला आम्ही संधी मानून काम केले. त्यासाठी ‘लोकमत’ परिवाराचे आम्हांला मोठे पाठबळ लाभले. ‘लोकमत’ची ताकद, क्षमतेमुळे कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मोठी मदत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

‘कोल्हापुरी फेटा’ बांधून सन्मान

या कार्यक्रमात विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांचा कोल्हापूर युनिटच्या वतीने ‘कोल्हापुरी फेटा’ बांधून आणि गुलाबपुष्पांचा मोठा हार घालून सत्कार करण्यात आला.
 

Web Title:  Due to 'Lokmat', the magnitude of the floods has reached Delhi: Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.