सावंतवाडी शहर ड्रग्जच्या विळख्यात, नगरसेविकेच्या प्रसंगावधानाने उधळली ड्रग्ज पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 05:27 PM2018-01-17T17:27:16+5:302018-01-17T17:27:43+5:30

सावंतवाडी शहरातील युवाई ड्रग्ज, गांज्याच्या विळख्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री जुनाबाजार-चॅपेल गल्ली येथे उघड झाला. पाच- सहा  कॉलेजच्या मुलांमध्ये सुरू असलेली नशेची पार्टी पालिकेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांच्यासह नागरिकांनी उधळून लावली.

Drugs Party In Sawantwadi City | सावंतवाडी शहर ड्रग्जच्या विळख्यात, नगरसेविकेच्या प्रसंगावधानाने उधळली ड्रग्ज पार्टी

सावंतवाडी शहर ड्रग्जच्या विळख्यात, नगरसेविकेच्या प्रसंगावधानाने उधळली ड्रग्ज पार्टी

googlenewsNext

 

सावंतवाडी - शहरातील युवाई ड्रग्ज, गांज्याच्या विळख्यात सापडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री जुनाबाजार-चॅपेल गल्ली येथे उघड झाला. पाच- सहा  कॉलेजच्या मुलांमध्ये सुरू असलेली नशेची पार्टी पालिकेच्या नगरसेविका अनारोजीन लोबो यांच्यासह नागरिकांनी उधळून लावली. त्यामुळे सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा नव्याने गांजा व ड्रग्ज गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, सावंतवाडी पोलिसांनी या विषयाच्या मुळाशी जाऊन यामागचा मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास न केल्यास महिलांना घेऊन उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अनारोजीन लोबो यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर आदी उपस्थित होत्या.
शहरातील जुनाबाजार-चॅपेल गल्ली परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील महाविद्यालयात अकरावी,  बारावीत शिकणारी पाच-सहा मुले-मुली संशयास्पदरित्या बसत होती. त्यांना एक-दोन वेळा तेथील नागरिकांनी विचारणाही केली होती. मात्र मंगळवारी रात्री १०.३० वाजता शालू फर्नांडिस या तेथील नागरिकांनी नगरसेविका अनारोजीन लोबो यांना फोन करून पाच-सहा मुले याठिकाणी गांजा दारू पित असल्याचे सांगितले. दरम्यान, लोबो यांनी तत्काळ मार्टिन डिसोजा, जोसेफ डिसोजा यांच्यासह काही नागरिकांच्या मदतीने त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी त्यांना दोन मुली व तीन-चार मुलगे हातात पेपरमध्ये काहीतरी घेऊन ओढत असल्याचे दिसून आले. शिवाय त्यांच्याकडे चिलिम, सिगारेट, दारूच्या बाटल्या व व्हाईटनर आदी वस्तू दिसून आल्या. सर्वांच्या अंगाला दारूचा वास येते होता. सर्वजण नशेच्या आहारी गेले होते. 
हा प्रकार पाहूून लोबो यांना धक्का बसला. तेथील नागरिकांनी हा प्रकार करणाºया सर्वांना चोप दिला. यावेळी आम्हाला सोडा, आमचे करिअर बरबाद होईल, अशी विनवणी त्या करू लागल्याचे लोबो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकाराची आपण तत्काळ पोलिसांना कल्पना दिली. मात्र कोणतीही तमा नसलेले पोलीस नेहमीप्रमाणे तब्बल दीड तासाने घटनास्थळी पोहोचल्याने लोबो यांनी नाराजी व्यक्त केली.
नशा करणारी मुल-मुली चांगल्या घराण्यातील असून सावंतवाडी शहर ड्रग्जच्या विळख्यात सापडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असून पोलीस यंत्रणेचा अशा प्रकारांकडे लक्ष नसल्याचे सांगत लोबो यांनी पोलिसांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली. या प्रकारामागचा सूत्रधार कोण, युवाईला अशा गोष्टी  पुरवितो कोण, याचा शोध घेणे गरजेचे असून याचा तपास येत्या चार दिवसात पोलीस यंत्रणेने करावा. आपण संबंधित मुलांची नावे गोपनीय ठेवण्याच्या अटीवर  पोलिसांना सांगण्यास तयार आहे. त्या माध्यमातून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा. अन्यथा शहरातील महिलांना घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा लोबो यांनी दिला.
दरम्यान, तब्बल दीड तासानंतर त्याठिकाणी आलेल्या पोलीस यंत्रणेने नशेसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करणे आवश्यक होते. मात्र तसे काहीही न करता आधी तक्रार द्या, अशी मागणी पोलिसांनी केल्याचा आरोपही लोबो यांनी केला. झालेला प्रकार लक्षात घेता पालकवर्गही याला जबाबदार असून आपली मुले रात्री- अपरात्री असतात कुठे, कोणासोबत जातात याकडे कानडोळा करतात. त्यामुळे प्रत्येक पालकाने यापुढे  खबादारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
 
चांगल्या घराण्यातील मुले 

या प्रकरणात आढळून आलेली मुले चांगल्या घराण्यातील आहेत. अकरावी-बारावीतील मुले असून यातील एकाची आई पिग्मी गोळा करण्याचे काम करते, तर एकाच्या वडिलांचे दारूच्याच आहारी जाऊन अलीकडे निधन झाल्याचे लोबो यांनी सांगितले. झालेल्या प्रकाराला पोलीस यंत्रणा जबाबदार असून अशा युवकांपर्यंत गांजा, ड्रग्ज पोहोचतोच कसा, असा प्रश्नही लोबो यांनी व्यक्त केला.
 
चार वर्षापूर्वी असाच प्रकार 
शहरात गांजा, ड्रग्ज सहजपणे युवकांपर्यंत पोहोचत आहे. यामागचा सूत्रधार कोण हे शोधून काढणे पोलिसांना आव्हान आहे. मात्र, चार वर्षांपूर्वी शहरातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या दप्तरात गांजा सापडून आला होता. त्यावेळी या प्रकारावर आवाज उठला होता, मात्र कालांतराने तो आवाज दाबला गेला. त्यामुळे या गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचायचे असेल, तर यावर तीव्र आवाज उठविणे गरजेचे आहे. 
 
महिलांच्या पाठिशी : साळगावकर
सावंतवाडी शहरात उघड झालेला हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. पोलीस यंत्रणेचा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतो. मात्र महिलांनी उचलेले आंदोलनाचे पाऊल योग्य असून याचा छडा लागणे गरजेचे आहे. त्यामुळे नगराध्यक्ष या नात्याने महिलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. 

Web Title: Drugs Party In Sawantwadi City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.