राज्यमंंत्री दिलीप कांबळे यांची हकालपट्टी करा, काँग्रेसने केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 04:55 AM2019-03-29T04:55:38+5:302019-03-29T06:16:15+5:30

औरंगाबाद जिल्ह्यातील विलास दादाराव चव्हाण यांनी फिर्याद दिली होती की, दिलीप काशीनाथ काळभोर (जि. पुणे) याच्याशी त्यांची एका कार्यक्रमात ओळख झाली होती.

Delegation of State Minister Dilip Kamble, Congress has demanded | राज्यमंंत्री दिलीप कांबळे यांची हकालपट्टी करा, काँग्रेसने केली मागणी

राज्यमंंत्री दिलीप कांबळे यांची हकालपट्टी करा, काँग्रेसने केली मागणी

Next

मुंबई : दारू दुकानाचा परवाना मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत एक कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील विलास दादाराव चव्हाण यांनी फिर्याद दिली होती की, दिलीप काशीनाथ काळभोर (जि. पुणे) याच्याशी त्यांची एका कार्यक्रमात ओळख झाली होती. तत्कालीन राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह मंत्रालयातील विविध अधिकाऱ्यांची चांगली ओळख असून, त्यांच्या माध्यमातून दारूच्या दुकानाचा परवाना मिळवून देण्याचे आमिष काळभोर याने चव्हाण यांना दाखविले. मुंबईतील ‘स्पेन्सर रिटेल’चा परवाना हस्तांतरित करून देतो. त्यासाठी दोन कोटी १५ लाख रुपये द्यावे लागतील, असे काळभोर याच्यासह दयानंद वुजलू वनंजे (रा. नांदेड) यांनी चव्हाण यांना सांगितले. याची खात्री पटवून देण्यासाठी दोन्ही आरोपींनी चव्हाण यांना राज्यमंत्री कांबळे यांच्या दालनात नेले. त्या वेळी अटी-शर्ती पूर्ण केल्यास परवाना मिळवून देऊ, असे आश्वासन खुद्द कांबळे यांनी चव्हाण यांना दिले होते. परवान्यासाठी चव्हाण यांनी १५ एकर शेती, खुलताबाद तालुक्यातील वडोद बुद्रुक येथील ‘माथेरान’ हॉटेल आणि औरंगाबादेतील आदित्यनगर येथील राहते घर बँकेकडे गहाण ठेवले. लाखोंची
रोख रक्कमही वेळोवेळी ‘आरटीजीएस’द्वारे वरील तिन्ही आरोपींसह सुनील जबरचंद मोदी (रा. कोल्हापूर) याच्या खात्यावर वर्ग केले. अशा प्रकारे चव्हाण यांनी या चौघांना एक कोटी ९२ लाख रुपये दिले होते. मात्र, परवाना मिळत नव्हता म्हणून चव्हाण यांनी तगादा लावला असता, आरोपींनी टाळाटाळ केली. फोन बंद करून ठेवले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर चव्हाण यांनी ५ नोव्हेंबर २०१८ रोजी पोलीस आयुक्तालयात तक्रार दिली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याने अखरे चव्हाण यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर १३ मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी काळभोर याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जास अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी विरोध केला. गुन्हा गंभीर असून, रणजित बाळासाहेब तुपे यांचीही आरोपींनी याच प्रकारे एक कोटी ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे, याचाही सखोल तपास करावयाचा आहे. आरोपीच्या अटकेशिवाय तपास होऊ शकत नाही. त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती मुंडवाडकर यांनी केली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
राज्यमंत्री कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना मंत्रिपदावर राहाण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

Web Title: Delegation of State Minister Dilip Kamble, Congress has demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.