सोशल मीडियातील फेक न्यूजच्या प्रतिबंधासाठी ‘सायबर सुरक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:57 AM2019-04-12T06:57:28+5:302019-04-12T06:57:37+5:30

सायबर पोलिसांकडून मार्गदर्शक पुस्तिका : ४८ मतदारसंघांतील निवडणूक अधिकाऱ्यांसाठी ठरणार उपयुक्त

'Cyber Security' for Fake News Prevention | सोशल मीडियातील फेक न्यूजच्या प्रतिबंधासाठी ‘सायबर सुरक्षा’

सोशल मीडियातील फेक न्यूजच्या प्रतिबंधासाठी ‘सायबर सुरक्षा’

Next

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर केला जाणारा प्रचार सर्वांत आघाडीवर आहे. प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून विरोधकांविरुद्ध फेक न्यूज व खोडसाळ घटना पसरविल्या जात आहेत. अशा बातम्यांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्टÑ सायबर विभागाने पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियाच्या प्रचाराबाबत जागृतीसाठी सायबर पोलिसांनी ‘सायबर सुरक्षा’ ही मार्गदर्शक पुस्तिका बनविली आहे.


या पुस्तिकेत निवडणूकविषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ईमेल्स, सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी आदींबाबत तपशीलवार माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना करून देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांच्या हस्ते त्या पुस्तिकेचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या वेळी राज्याचे सायबर विभागाचे पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह, अधीक्षक डॉ. बाळसिंग रजपूत आदी उपस्थित होते.


लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठी आयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सध्याच्या सोशल मिडियावर प्रसारित होणारा मजकूर पाहता त्याचा गैरवापर होऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी बनविलेल्या पुस्तिकेत भारत सरकारने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४२ अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध केली आहे.


आयोगाच्या सी-व्हिजिलसह इतर अधिकृत अ‍ॅप्स, संकेतस्थळे तसेच तक्रारींसाठी महत्त्वाच्या नोडल्स संस्थांची माहिती या पुस्तिकेत आहे. हॅक अथवा हायजॅक झालेल्या सोशल मीडिया खात्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सायबरशी संपर्क साधण्याचे आवाहन अधीक्षक रजपूत यांनी केले आहे. ही पुस्तिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि उर्दू या भाषांत बनविण्यात आली आहे.

असे आहेत पर्याय
फेसबुक पोस्टच्या वर उजव्या बाजूच्या कोपºयात ‘ही फेक न्यूज स्टोरी आहे’ हा पर्याय तर व्हॉटसअ‍ॅपवर अफवा अथवा माहिती खातरजमा करण्यासाठी ‘व्हॉटसअ‍ॅप चेकपॉइंट टीपलाइन’वर पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्हॉटसअ‍ॅपवर निवडणुकीच्या संदर्भातील खोट्या बातम्या, अफवा, प्रक्षोभक मजकूर, चित्रांबद्दल सतर्क राहण्यासह त्याविषयी महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत.

Web Title: 'Cyber Security' for Fake News Prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.