"सध्या तर सरकारं उद्योगशरण, विमान कंपनीच्या..."; राज ठाकरेंची बाबा आढावांसाठी भावूक पोस्ट, केंद्र सरकारला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:13 IST2025-12-09T12:10:34+5:302025-12-09T12:13:07+5:30

Raj Thackeray Baba Adhav: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उजाळा दिला. त्याच्या कार्याचा उल्लेख करतानाच राज ठाकरेंनी केंद्र सरकारलाही सुनावले. 

"Currently, the government is the protector of industries, airlines..."; Raj Thackeray's emotional post for Baba's review, addressed to the Central Government | "सध्या तर सरकारं उद्योगशरण, विमान कंपनीच्या..."; राज ठाकरेंची बाबा आढावांसाठी भावूक पोस्ट, केंद्र सरकारला सुनावले

"सध्या तर सरकारं उद्योगशरण, विमान कंपनीच्या..."; राज ठाकरेंची बाबा आढावांसाठी भावूक पोस्ट, केंद्र सरकारला सुनावले

Raj Thackeray Indigo flights issue: "बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील ? माहित नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे", अशा भावना व्यक्त करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली. यानिमित्ताने त्यांनी संघटित आणि असंघटित कामगारांच्या प्रश्नांबद्दल खंत व्यक्त केली. सध्याची सरकारं तर उद्योगांना शरण गेलेली आहेत, ते उद्योगांना शिस्तही लावू शकत नाहीत, असे खडेबोल राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावले. 

बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत राज ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटलंय की, "ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्राने या देशांत समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकर्यांच मोहोळ तयार केलं. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव बाबा आढाव."

ठाकरे म्हणाले, हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का?

"बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर. पण डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात ढकलून घेतलं. महाराष्ट्राचं हे एक वैशिष्ट्य की, सामाजिक क्षेत्रांत उत्तुंग कार्य केलेली माणसं, उच्चशिक्षित आणि जर त्यांनी त्यांच्या क्षेत्रांत करिअर करायचं ठरवलं असतं तर तितकीच मोठी कारकीर्द घडवू शकले असते अशी माणसं सामाजिक क्षेत्रांत आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आकार दिला. हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का? माहित नाही. हल्ली सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे, स्वतःचे तशा नावाचे फ्लेक्स लावणाऱ्यांचा सुळसुळाट आहे", असे राज ठाकरे म्हणाले.  

पुढे राज ठाकरे म्हणतात, "असो, पण रिक्षा पंचायत असो, हमाल पंचायत असो की १९७२ साली एक गाव एक पाणवठासाठी उभी केलेली चळवळ असो, की १९६९ ला राज्यात मंजूर झालेला महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा असो, हे बाबांचं मोठं योगदान. बाबा आढावांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा केला."

आताची सरकारे उद्योगशरण, शिस्तही लावू शकत नाही

राज ठाकरे यांनी इंडिगोच्या गोंधळावर बोट ठेवत केंद्र सरकारलाही सुनावले. "आर्थिक उदारीकरणाच्या नंतरच्या काळात कामगारांचं आणि श्रमिकांच शोषण करणारी एक नवी व्यवस्था आता जन्माला आली आहे. आणि जिला सरकारचं समर्थन आहे. सध्या तर सरकारं ही उद्योगशरण आहेत आणि कामाचे तास, वेळा याबाबत सरकार उद्योगजगताला शिस्त देखील लावू शकत नाही, हे नुकत्याच विमान कंपनीच्या उदाहरणातून दिसलं. यामुळे संघटित असो की असंघटित कामगार किंवा नव्याने उदयाला येत असलेला ज्याला 'गिग वर्कर' म्हणता येईल असे सगळेच असुरक्षतितेच्या गर्तेत सापडले आहेत", असे म्हणत राज ठाकरेंनी केंद्राच्या धोरणावर निशाणा साधला.  

"बाबा आढावांची एकूणच समाजकारणाकडे बघण्याची भूमिका व्यापक होती आणि त्यामुळेच ईव्हीएमच्या विरोधात वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. हे खरं समाजकारण जे एनजीओ संस्कृती उदयाला येण्याच्या आधीच्या काळातलं, जिथे प्रत्येक विषयात मतं होती आणि ठोस भूमिका होती. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील ? माहित नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे, त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा. बाबा आढावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली", अशा शब्दात राज ठाकरेंनी बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

Web Title : राज ठाकरे ने सरकार को लताड़ा, बाबा आढाव को भावुक श्रद्धांजलि दी।

Web Summary : राज ठाकरे ने बाबा आढाव को श्रद्धांजलि दी, सामाजिक कार्यकर्ताओं के पतन पर शोक व्यक्त किया और सरकार के उद्योग-समर्थक रुख की आलोचना की। उन्होंने श्रम शोषण और विनियमन की कमी पर प्रकाश डाला, खासकर विमानन क्षेत्र में, श्रमिकों की असुरक्षा पर चिंता व्यक्त की।

Web Title : Raj Thackeray slams government, remembers Baba Adhav with emotional tribute.

Web Summary : Raj Thackeray paid tribute to Baba Adhav, lamenting the decline of social workers and criticizing the government's pro-industry stance. He highlighted labor exploitation and lack of regulation, especially in the aviation sector, expressing concern for worker insecurity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.